कोल्हापूर | पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या उत्तर कोल्हापूर पोटनिवडणुकीची मतमोजणी आज होत आहेत. काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेवर झालेल्या या जागेवर ही निवडणूक झाली. या निवडणुकीत काँग्रेसकडून चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी देण्यात आली. तर भाजपने सत्यजीत कदम यांना उमेदवारी दिली होती.
सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरुवात झाली असून 26 फेऱ्यात मतमोजणी होणार आहे. सतेज पाटलांच्या कसबा बावड्यातून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सरनोबतवाडी इथल्या शासकीय गोदामात ही प्रक्रिया पार पडत असून यामध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. काँग्रेस आणि भाजप यांच्यात प्रामुख्याने ही लढत झाली. अत्यंत चुरशीने याची प्रचार प्रक्रिया दोन्ही बाजूंनी राबवली गेली.
उत्तर कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या या निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या असून हा निकाल राजकीय पक्षांसाठी खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. कारण, आगामी महानगरपालिका निवडणुकांत या निवडणुकीचा परिणाम दिसण्याची दाट शक्यता आहे.