पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त चौंडी येथे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही उपस्थिती होती. मात्र यानिमिताने चौंडीत जाण्यापासून भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांना पोलिसांनी अडवल्याने भाजपने मविआ सरकारवर प्रचंड टीका केली. तर दुसरीकडे राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी रोहित पवारांचे कौतुक केले. यावरूनच रोहित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
“आपल्या उथळ वागण्यातून गल्लीत खळखळ करणाऱ्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती स्वकर्तृत्वावर दिल्लीत साजरी करणाऱ्या जानकर साहेबांकडून बोध घ्यावा आणि अहिल्यादेवींसारख्या महान व्यक्तींचे विचार लोकांपर्यंत पोचवता येत नसतील तर किमान त्यांना संकुचित करण्याचं काम तरी करू नये.”, असा टोला रोहित पवार यांनी ट्वीट करत पडळकरांना लगावला आहे.
रासप अध्यक्ष महादेव जानकर यांनी काल दिल्लीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी केली. तसेच अहिल्यादेवी यांची जयंती साजरी करण्याचा सर्वांचा अधिकार असून रोहित पवार यांनी जयंती साजरा करून चांगले कार्य केले असल्याचे जानकर यांनी म्हटले आहे. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, “आहिल्यादेवी होळकर यांची जयंती चौंडीला नेहमी कुठलाही पक्ष अभिनिवेश न ठेवता साजरी केली जाते. सर्व प्रकारचे लोक त्या ठिकाणी येतात. पण मला असं वाटतं की यावेळी सरकारी तंत्राचा उपयोग करून, या ठिकाणी पुण्यश्लोक राजमाता आहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी हायजॅक करण्याचा प्रयत्न हा झालेला आहे. हे अत्यंत चुकीचं आहे.”