दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयने धाड मारली आहे. एक्साईज पॉलिसीमधील अनियमिततेमुळे ही छापेमारी करण्यात आली आहे. सिसोदिया यांच्या घराशिवाय दिल्ली-एनसीआरमधील २० ठिकाणीही सीबीआयने छापेमारी सुरू केली आहे. एक्साईज पॉलिसीत अनियमितात झाल्याने उपराज्यपाल व्हि.के, सक्सेना यांनी सीबीआय चौकशीची शिफारस केली होती.
या शिफारशीनंतर सीबीआयने हे धाडसत्र सुरू केलं आहे. सीबीआय चौकशीला आम्ही पूर्ण सहकार्य करू. या चौकशीतून लवकरच सत्य बाहेर येईल. माझ्यावर अनेक खटले दाखल केले आहेत. मात्र, त्यांच्या हाती काही लागले नाही. यातही काही निघणार नाही, असं उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी म्हटलं आहे. सिसोदिया यांनी ट्विट करून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
एक्साईज पॉलिसी संदर्भात मुख्य सचिवांनी अहवाल दिला होता. त्या आधारे उपराज्यपालांनी सीबीआय चौकशीची शिफारस केली होती. मनिष सिसोदियांवर नव्या एक्साईज ड्युटीमध्ये अनियमितता केल्याचा आरोप केला आहे. एक्साईज डिपार्टमेंटचा प्रभार सिसोदिया यांच्याकडेच आहे. दोन महिन्यांपूर्वीच मुख्य सचिवांना अहवाल सादर करायचा होता. या अहवालात जीएनसीटीडी अॅक्ट १९९१, ट्रांजेक्शन ऑफ बिजनेस रूल्स 1993, दिल्ली एक्साईज अॅक्ट २००९ आणि दिल्ली एक्साईज रूल्स २०१० च्या नियमांचं उल्लंघन केलं आहे.