राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पाऊस; वाचा सविस्तर कुठे कुठे पडणार

मुंबई – एकीकडे उन्हाच्या तापमानात वाढ होत असताना वातावरणात बदल होताना दिसत आहे. पुढील चार दिवस मध्य भारतासह राज्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. काही दिवसांपूर्वी काही जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर आता पुन्हा आगामी 4 दिवस मुंबई-कोकणसह राज्यातील सर्वच भागात सोसाट्याच्या वार्‍यासोबत पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

देशात सध्या अनेक ठिकाणी कमी दाबाचे पट्टे निर्माण झाले आहेत. त्यामुळे दक्षिण भारतासह उत्तरेकडील काही राज्यांत अवकाळी पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि तमिळनाडूची दक्षिण किनारपट्टी दरम्यान तीव्र कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. राज्यातील दक्षिण भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

अनेक जिल्ह्यांत पारा चांगलाच तापला आहे. मराठवाडा आणि विदर्भ भागात उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. अचानक झालेल्या वातावरण बदलामुळे पुढील चार दिवस पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य भारतासह महाराष्ट्रात काही ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशी माहिती हवामानतज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिली आहे.

पावसाचा अंदाज

सोमवारी- सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि संपूर्ण मराठवाडा.मंगळवारी- अहमदनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि संपूर्ण मराठवाडा.बुधवारी- अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सोलापूर, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि संपूर्ण मराठवाडा

ग्लोबल न्युज नेटवर्क: