केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ‘शिवतीर्थ’वर ; गडकरी-राज ठाकरेंमध्ये भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ‘शिवतीर्थ’वर ; गडकरी-राज ठाकरेंमध्ये भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

 

मुंबई, 3 एप्रिल : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) दाखल झाले आहेत. नितीन गडकरी हे राज ठाकरेंच्या घरी भेटीसाठी दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे.

गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi) जोरदार टीका केली. त्यानंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया आल्या आणि मनसेला भाजपची बी टीम असंही संबोधण्यात आलं. त्यानंतर आज नितीन गडकरी हे राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचल्यामुळे विविध चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे.

येत्या काळात मुंबईसह राज्यातील विविध महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या निवडणुकांत भाजप-मनसे युती होणार का? अशी ही चर्चा सुरू झाली आहे.

काही दिवसांपूर्वी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सुद्धा राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचले होते. राज ठाकरे हे आपल्या नव्या घरात शिफ्ट झाल्यानंतर प्रथमच देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंच्या घरी दाखल झाले होते. 24 नोव्हेंबर रोजी दोन्ही नेत्यांमध्ये ही भेट झाली होती. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस हे राज ठाकरेंचे निवासस्थान शिवतीर्थावर दाखल झाले होते.

ही एक कौटुंबिक भेट असल्याचं बोललं गेलं होतं. मात्र, तसे असले तरी या भेटीला केवळ कौटुंबिक भेट बोलता येणार नाही. कारण, गेल्या काही दिवसांत राज ठाकरेंची हिंदूत्वाच्या संदर्भात घेतलेली भूमिका महत्त्वाची आहे. यासोबतच मनसे आणि भाजप यांची आगामी मुंबई मनपाच्या निवडणुकांत युती होण्याचीही गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे.

 

या भेटीवर प्रवीण दरेकर यांनी म्हटलं, राज ठाकरेंनी कालच्या भाषणात हिंदुत्वाची भूमिका अधोरेखित केल्यामुळे स्वाभाविकपणे भाजप आणि भाजपच्या नेत्यांमध्ये स्वागतार्ह वातावरण आहे. भाजपने हिंदुत्वाची भूमिका घेत देशभर लढते आणि काम करते. अशावेळी राज ठाकरेंसारख्या एका मोठ्या नेत्याने किंबहूना त्यांच्या पक्षाने ही भूमिका घेतल्याने स्वाभाविकच गडकरी साहेबांनाही आनंद होईल. गडकरी साहेब आणि राज ठाकरेंचे मित्रत्वाचे संबंध आहेत. गडकरी साहेब आजच त्यांच्या भेटीला गेले नाहीयेत. गडकरी साहेब यापूर्वी सुद्धा त्यांच्या भेटीला गेले आहेत.

या दोन्ही नेत्यांमध्ये चांगले संबंध आहेत. आता भेटल्यामुळे कालच्या भाषणावर, त्यांनी घेतलेली भूमिका यावर चर्चा होऊ शकते. भविष्याच्या वाटचालीत चांगली चिन्ह ही असू शकतात. काही होणारच नाही असं म्हणण्याचं कारण नाही असं म्हणत दरेकरांनी या भेटीकडे सकारात्मकपणे पाहत असल्याचं म्हटलं आहे. एबीपी माझा वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना प्रवीण दरेकर यांनी हे विधान केलं आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: