उमेश कोल्हे हत्या प्रकरणात आतापर्यंतची सर्वात मोठी माहिती समोर, एनआए’ने केला खुलासा

 

मोहम्मह पैगंबर यांच्याबाबत वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचे समर्थन केल्याप्रकरणी अमरावतीमधील औषध व्यावसायिक उमेश कोल्हे यांची अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर देशभरात संतापाची मोठी लाट उसळली होती. उमेश कोल्हे यांनी सोशल मीडियावर नुपूर शर्मा यांचे समर्थन करणारी पोस्ट केली होती. त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आल्याचे पोलीस तपासात उघड झाले होते. भाजप खासदारांच्या मागणीनंतर या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) सोपवण्यात आला होता. एनआयएने (NIA) आता या प्रकरणात मोठा खुलासा केला आहे.

21 जून रोजी अमित मेडिकल्सचे संचालक उमेश‍ कोल्हे हे दुकान बंद करून बाईकने घरी जात असताना रात्री 10.30 च्या सुमारास श्याम चौकातील घंटाघर परिसरात चाकूने वार करून त्यांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी शहर कोतवाली पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून सुरुवातीला सहा जणांना अटक केली होती. त्यानंतर आणखी आरोपींनी अटक करण्यात आली.

“या प्रकरणात मुदस्सीर अहमद उर्फ सोनू रजा शेख इब्राहिम (22), शाहरूख पठाण उर्फ बादशाह हिदायत खान (25), अब्दूल तौफिक उर्फ नानू शेख तस्लिम (24), शोएब खान उर्फ भुऱ्या साबीर खान (22), अतिब रशीद आदिल रशीद (22) आणि युसूफ खान बहादूर खान (44) या आरोपींना सुरुवातीला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यापैकी मुदस्सीर अहमद, शाहरूख पठाण खान, अब्दूल तौफिक यांनी तीन दिवस उमेश कोल्हे यांच्यावर पाळत ठेवून सर्व माहिती काढली. त्यानंतर उमेश कोल्हे यांच्या घरी जाण्याच्या मार्गावर त्यांना गाठत अत्यंत निर्घुणपणे त्यांची हत्या केली,” अशी माहिती पोलिसांनी दिली होती.

तबलिगी जमातच्या कट्टरपंथी इस्लामवाद्यांनी उमेश कोल्हे यांची हत्या केल्याचे एनआयएने सांगितले आहे. एनआयएने या प्रकरणात न्यायालयात आरोपपत्र दाखल करत ही माहिती दिली आहे. “तबलिगी जमातच्या कट्टरपंथी इस्लामीवाद्यांनी प्रेषित मोहम्मद यांच्या कथित अपमानाचा बदला घेण्यासाठी उमेश कोल्हे यांची हत्या केली. तबलिगी जमातच्या सदस्यांनी धार्मिक भावना दुखावल्याबद्दल कोल्हे यांची हत्या केली,” असे एनआयएने आपल्या आरोपपत्रात म्हटले आहे.

Team Global News Marathi: