उद्धव ठाकरेंकडे बघून एवढंच म्हणावं वाटतं ‘नवा आहे पण छावा आहे!’

उद्धव ठाकरेंकडे बघून एवढंच म्हणावं वाटतं ‘नवा आहे पण छावा आहे!’

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रत्यक्ष पदावर येऊन येत्या नोव्हेंबर २८ ला दोन वर्षं होतील. ठाकरे घराण्यात प्रत्यक्ष राजकारणात उडी घेणारे पहिले ठाकरे आदित्य ठाकरे. त्यानंतर सेनेने ठरवून मुख्यमंत्रीपद मिळवलं आणि रिमोट कंट्रोलची परंपरा संपवली.

माणूस प्रत्यक्ष एखाद्या पदावर असतो तेव्हां तो काम करताना गांगरतो. मात्र उद्धव ठाकरे वयाच्या साठीत मुख्यमंत्री झाले. साठ वर्षे त्यांच्या घरी राजकीय लोकांची उठबस होती. उद्धव ठाकरेंचं निरीक्षण ते बघणं यासाठी त्यांना भरपूर वेळ मिळाला. प्रबोधनकार आजोबा, हिंदूहृदयसम्राट , मराठी अस्मितेचे मानबिंदू असणारे वडील हा असा भरभक्कम वारसाही त्यांना लाभला.

 

घरातील मोठ्ठी माणसं जर कर्तृत्ववान असतील तर पुढच्या पिढीवर एक मोठ्ठा दबाव असतो. कणखर , राकट, प्रभावशाली अशा कित्येक उपमा प्रबोधनकारांना आणि शिवसेनाप्रमुखांना देता येतील. मात्र उद्धव ठाकरेंनी ना बाळासाहेबांना, ना प्रबोधनकारांना कॉपी केलं. ते उद्धव ठाकरेच राहीले.

 

शांत स्वभाव, छळकाटी देहयष्टी, जर त्यांना एवढा मोठ्ठा वारसा नसता तर ते अगदी आपल्या मुंबईतल्या सामान्य नोकरदार माणसासारखेच असते. त्यांचं सामान्य दिसणं हाच त्यांचा मोठ्ठा गुण आहे.

 

पक्षप्रमुखाची माळ त्यांच्या गळ्यात पडली, तेव्हा ते थोडे चाचपडत असल्यासारखे दिसत होते. फडणवीसांनी मागच्या मुंबई महापालिका निवडणूकीत त्यांची खिल्ली उडवताना त्यांचे त्या काळातले काही परमनंट डॉयलाग जसे मर्द, नामर्द, कोथळा, तलवार हे म्हणून दाखवलं होतं. पण उद्धव ठाकरेंनी सुरवातीला या डायलॉग शब्दांच्या आधारे आहे ती गर्दी टिकवून ठेवायचं काम केलं होतं. दसरा मेळावा असो कि मुंबई कोकणातल्या सभा त्यांची गर्जना (?) ही अशीच असायची.

 

पण गेल्या दोन वर्षातले उद्धव ठाकरे हे असले काही शब्द वापरताना दिसत नाहीत. उलट ते आता ते गेले २० वर्षं प्रत्यक्ष राजकारणात असल्याएवढे प्रगल्भ वाटतात. महाराष्ट्र त्यांच्याकडे एक जबाबदार कुटूंबप्रमुख म्हणून पाहतो. हे कुणी मान्य करो अथवा न करो. मात्र हे आहेच.

 

ते प्रसंग कितीही बाका असो, प्रचंड संवेदनशीलतेने हाताळतात. भंडाऱ्यात जेव्हा अग्निकांड झालं आणि बालकांचा मृत्यु झाला तेव्हां ते ज्यांची बालकं त्या अग्निकांडात मृत्युमूखी पडली त्यांच्या कुटूंबीयांना भेटले. माध्यमासमोर आल्यावर ते प्रामाणिकपणे म्हणाले मी त्या कुटूंबियांसमोर गेलो आणि हात जोडले.

 

अभ्यास करू, समीती नेमू वगैरे राजकीय/सरकारी भाषा त्यांच्याकडे नाही. त्यांचं बोलणं धीर देणारं आणि ओलावा असणारं मायाळू आहे.

त्याला कारणही तसंच आहे. त्यांच्या साठ वर्षाच्या आयुष्यात त्यांनी कित्येकदा असे प्रसंग पाहिलेत, ऐकलेत, त्यावरच्या प्रतिक्रिया पाहिल्यात आणि त्याचे होणारे परिणामही पाहिलेत. त्यातून त्यांचा स्वतःचा एक अभ्यास झालाय आणि तो गेल्या दीडेक वर्षात पावलोपावली दिसतोय. कोरोना काळातले त्यांचे फेसबुक लाईव्ह बघा, किंवा पत्रकारपरिषद बघा त्यातून त्यांचं ‘जबाबदार’ असणंच जाणवतं.

 

राज्यच काय देशच वाईट परिस्थितीतून जातोय. त्यातून केंद्रसरकारची नियत बरोबर नाही. त्यात ठाकरे नवखे. फडणवीसांना ठाकरे झेपत नाहीत हे केंद्रीय नेतृत्वाला लक्षात यायला दीड वर्षे लागली. पण त्याआधी त्यांनी राणे नावचा पर्याय ठेवला होता. राणेही सुशांतसिह प्रकरणापासून सतत स्वतःला सिद्ध करत होते. शेवटी केंद्राने राणेंची निवड केली आणि त्यांचा यथोचित राज्याभिषेक केला.

 

पडळकर, दरेकर, फडणवीस , चंद्रकांत पाटील हे नेते आहेत पण त्यांच्या आवाजाला मर्यादा आहेत. राणेंचं तसं काही नाही. राणे तुटून पडत असतात. पण राणेंकडून राजकीय टीकाटिप्पणीचा स्तर प्रचंड खालावला होता हे कुणीही मान्य करेल. देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा विधानाचं समर्थन केलं नाही.

 

राणे जर रोज असे बोलत राहीले तर उद्या आणखी काही लोकही बोलतील, राणेंना मंत्रीपद मिळाल्यावर काहींना सेनाभवनावर जायचेही डोहाळे लागले होते. पण आजच्या कारवाईने गर्भपातच झाला म्हणटलं तर वावगं ठरणार नाही.

उद्धव ठाकरे प्रत्यक्ष राजकारणात नवे असतील पण राजकारणातलं त्यांचं निरीक्षण जबरदस्त आहे. केंद्राने राणे नावचा दूसरा पर्याय आजमावून पाहायचा प्रयत्न केला. पण आजच्या कारवाईने तो हाणून पाडला. आज अटकेनंतर भाजपच्या कोणत्याच नेत्याची भाषा आक्रमक नव्हती. हा जागेवर लागलेला निकाल आहे.

नवा आहे, तर तो घाबरेल, गडबडेल, चूक करेल, मग संधी साधू असं काही गणित भाजपच्या चाणक्यांनी घातलं होतं ते मोडीत निघून उद्धव ठाकरेंची पकड आणखी मजबूत झाली.

उद्धव ठाकरे संयमी आहेत. ज्या माणसाने साठ वर्षे वाट पाहीली तो साधासुधा नाही. तो अत्यंत तयारीचा माणूस आहे हे भाजपच्या ध्यानी नाही. त्यांना नवा समजणे ही मोठ्ठी चूक आहे.

उद्धव ठाकरेंकडे बघून एवढंच म्हणावं वाटतं ‘नवा आहे पण छावा आहे!’

✍️ – Shrenik Narde

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: