राणे प्रकरणावर जुळवून घेण्यास ‘त्या’ बंद दाराआडच्या बैठकीत संमती?

मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृहात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात जवळजवळ १० मिनिटे एकांतात चर्चा झाली. या चर्चेचा तपशील जाहीर झाला नसला तरी या भेटीमुळे राणे प्रकरणावर जुळवून घेण्यावर सहमती झाल्याची चर्चा मात्र सुरू झाली.

आज सकाळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणावर चर्चा करण्यासाठी सर्व पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरही उपस्थित होते. ही बैठक संपल्यानंतर सभागृहाजवळच्या खोलीत मुख्यमंत्र्यांनी जवळजवळ १० मिनिटे फडणवीस आणि दरेकर यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर दरेकर यांना खोलीबाहेर पाठविण्यात आले व या दोन्ही नेत्यांमध्ये पुढची दहा मिनिटे चर्चा झाली.

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये राज्यात विस्तव जात नाही. परस्परांवर कुरघोडी करण्याची संधी कोणीही सोडत नाही. नारायण राणे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर तर हे राजकीय वैमनस्य अधिकच तीव्र झाले. त्यातच केंद्रीय मंत्रिमंडळात नव्याने समावेश झालेल्या नारायण राणे, डॉ. भागवत कराड, डॉ. भारती पवार आणि कपिल पाटील, या मंत्र्यांनी आपापल्या भागात जन आशिर्वाद यात्रा काढल्याने आणि या यात्रांना मिळत असलेल्या प्रतिसादामुळे सत्ताधारी पक्षांचे नेते अस्वस्थ झाले. त्यातच नारायण राणे यांच्या कथित वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांना अटक करण्यापर्यंतचे पाऊल राज्य सरकारने टाकले.

सरकारच्या या भूमिकेबरोबरच सत्ताधारी शिवसेनेकडून अनेक ठिकाणी तोडफोड करण्यात आली. या सर्व प्रकारामुळे नारायण राणे यांच्या जन आशिर्वाद यात्रेत खंड पडला. जामिनावर सुटलेले राणे यांनी लगेचच दुसऱ्या दिवशी कोकणात जन आशिर्वाद यात्रा पुढे चालू ठेवण्याची घोषणा केली. त्यापाठोपाठ सरकारकडूनही रत्नागिरी आणि सिंधुदूर्गात जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले. राणे यांच्या यात्रेला रोखण्यासाठी नव्हे तर कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून जमावबंदी जारी करण्यात आल्याची मल्लिनाथीही शिवसेनेच्या काही नेत्यांनी केली. त्याचवेळी या यात्रेत शिवसेनेवर टीका झाल्यास आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा आमदार वैभव नाईक यांनी दिला. मात्र, राणे यांनी यात्रा चालू ठेवण्याचा निर्धार केला.

त्यानुसार आज रत्नागिरीतून यात्रा पुढे सुरू झाली. सरकारकडून या यात्रेला अटकाव केला जाईल अशी अपेक्षा होती. परंतु, दोन दिवसांपासून रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यात रस्त्यावर संचलन करून आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करणारे पोलीस यात्रेच्या आडवे आले नाहीत. या दौऱ्यात नारायण राणे यांनी शिवसेनेवर कडाडून टीका केली. पण, शिवसैनिकांकडून रस्त्यावर कोणतीही प्रतिक्रिया उमटली नाही. त्यावरूनच सरकारने आता राणे प्रकरणावर नमते घेतले असल्याची चर्चा सुरू झाली. मुख्यमंत्री ठाकरे आणि विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्यात याच मुद्द्यावर अधिक चर्चा झाल्याचे बोलले जाते. येत्या काळात या चर्चेत नेमके काय ठरले ते कृतीत दिसून येईल, अशी चर्चा आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: