“उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगला सोडायला नको होता”; राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये नाराजीचा सूर

 

शिवसेनेतील बडे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर दुसऱ्या दिवशी राजकीय हालचालींना प्रचंड वेग आल्याचे दिसत आहे. अशातच त्यांना अनेक आमदारांनी आणि मंत्र्यांनी पाठिंबा दिल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधत शिवसेनेतील बंडखोर आमदारांना भावनिक साद घालत परत येण्याचे आवाहन केले होते.

मात्र दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत प्रस्ताव फेटाळल्याचे पाहायला मिळाले होते. यानंतर उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडला आणि मातोश्रीवर दाखल झाले. परंतु, उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडायला नको होता, असा नाराजीचा सूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीतून उमटल्याचे सांगितले जात आहे.
काल दिवसभरात घडामोडींदरम्यान एकनाथ शिंदे यांना पाठिंबा वाढल्याचे पाहायला मिळाले.

मुंबईसह राज्यातील अन्य आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाल्याचे चित्र दिसले. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची ताकद वाढल्याचे सांगितले जात आहे. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या फेसबुक लाइव्हनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार त्यांना भेटायला वर्षा बंगल्यावर गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील यांच्यासह काही मंडळी होती. मात्र, यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या अन्य एका बैठकीत उद्धव ठाकरेंच्या वर्षा बंगला सोडण्याच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

Team Global News Marathi: