मुख्यमंत्री ठाकरेंच्या अवतीभवतीचे बडवे वाईट, त्यांच्यामुळेच शिवसेनेत फूट

 

शिवसेनेतील बडे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर दुसऱ्या दिवशी राजकीय हालचालींना प्रचंड वेग आल्याचे दिसत आहे. अशातच त्यांना अनेक आमदारांनी आणि मंत्र्यांनी पाठिंबा दिल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधत शिवसेनेतील बंडखोर आमदारांना भावनिक साद घालत परत येण्याचे आवाहन केले तर दुसरीकडे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी नाव न घेता थेट मिलिंद नार्वेकर यांच्यावर निशाणा साधला होता.

मुख्यमंत्री म्हणजेच “आमचा विठ्ठल” चांगला आहे. मात्र त्यांच्या अवतीभवतीचे बडवे वाईट आहेत. शिवसेनेत याच बडव्यांमुळे फूट पडली आहे. हे बडवे मुख्यमंत्र्यांना कोणाशी भेटू देत नाहीत, कामे होऊ देत नाहीत, असे म्हणत विदर्भातील मोर्शी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी मुख्यमंत्र्यांचे सहायक मिलिंद नार्वेकर यांच्यावर निशाणा साधलाय.

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या अवतीभवतीचे वातावरण आणि माणसं लवकरात लवकर बदलण्याची गरज आहे. आमचा विठ्ठल चांगला आहे, मात्र त्यांच्या अवतीभवती असलेल्या चारपाच बडव्यांनी त्याला घेरलंय. त्या बडव्यांमुळेच मातोश्री बदनाम होत आहे, तसेच जे आमदार नाराज होऊन गेले आहेत ते याच बडव्यांमुळे नाराज होऊन गेले आहेत. मुख्यमंत्र्यांची भेट होत नाही, त्यांचा वेळ मिळत नाही. त्यामागचं प्रमुख कारण हे बडवे आहेत.”

दरम्यान, हे बडवे कोण याबद्दल देवेंद्र भुयार स्पष्ट काही बोलले नसले तरी मिलिंद नार्वेकर यांच्यावर त्यांनी निशाणा साधल्याचे त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट होते. “नार्वेकर यांची क्षमता काय, कौशल्य काय हे सर्वांना माहीत आहे. तेच आमदारांना आणि नेत्यांना मुख्यमंत्र्यांना भेटू देत नाही असा आरोप भुयार यांनी केला होता.

Team Global News Marathi: