उद्धव ठाकरेंसमोरच शिवसेनेचे २ बडे नेते एकमेकांना भिडले!

 

– एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. शिंदे यांच्यासोबत विधानसभेचे ४० आमदार आणि लोकसभेतील १२ खासदारांनी नेतृत्वाविरोधात बंड पुकारलं आहे. त्यामुळे शिवसेनेत संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल सध्या पाहायला मिळत आहे. खरी शिवसेना आमचीच आहे असा दावा एकनाथ शिंदे गटाकडून केला जात आहे. मात्र शिंदे गटाला पाठिंबा देणाऱ्यांची हकालपट्टी करण्याचं सत्र शिवसेनेत सुरूच आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीचा सर्वाधिक फटका मराठवाड्यात बसला आहे. कारण शिंदे गटात सहभागी होणाऱ्या आमदारांची संख्या जास्त आहे. त्यात औरंगाबाद येथील शिवसेनेच्या नियुक्तीवरून आता वाद निर्माण झाला आहे. किशनचंद तनवाणी यांच्या नियुक्तीवरून माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि आमदार अंबादास दानवे यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे. औरंगाबादच्या पदाधिकारी नियुक्तीबाबत मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोरच दोन्ही नेत्यांमध्ये खडाजंगी झाल्याचं समोर आले आहे.

किशनचंद तनवाणी यांची औरंगाबादच्या जिल्हाप्रमुखपदी नेमणूक करण्यात आली. परंतु तनवाणी यांना दिलेल्या नव्या जबाबदारीवरून खैरै-दानवेंमध्ये वाद झाला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी बाजूच्या खोलीत जा, तोडगा काढल्यानंतरच माझ्यासमोर या असं दोन्ही नेत्यांना सुनावलं. त्यानंतर वाद मिटवण्यासाठी तनवाणी यांना जिल्हाप्रमुखपदाऐवजी महानगर प्रमुख पद देण्यावर एकमत झाले. स्वतंत्र जबाबदारी देण्यावरून सहमती झाली आणि वाद मिटवण्यात आला.

Team Global News Marathi: