‘अग्निपथ’विराेधी हिंसाचार प्रकरणी एका नेत्याला बिहारमधून केली अटक

 

अग्निपथ योजनेच्या विरोधात बिहारात झालेल्या हिंसाचारामागे माओवाद्यांचा हात असल्याचा दावा बिहार पोलिसांनी केला आहे. एका वरिष्ठ माओवादी नेत्यास अटक केल्यानंतर ही माहिती समोर आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ जूनमध्ये झालेल्या आंदोलनात लखिसराय येथे एक रेल्वे जाळण्यात आली होती.

याप्रकरणी माओवादी नेता मनश्याम दास यास नुकतीच अटक करण्यात आली. त्याने पोलिसांना सांगितले की, आपल्या सहानुभूतदारांच्या मदतीने आपण रेल्वे जाळली होती. एका गटाने आंदोलकांना हिंसाचारासाठी चिथावणी दिल्याचेही त्याने पोलिसांसमोर कबूल केले. तेलंगणा पोलिसांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मनश्याम दास यास लखिसरायमधून अटक करण्यात आली होती.

काही दिवसांपूर्वी भाड्याने घेतलेल्या एका घरातून तो आपल्या कारवाया करीत होता. त्याचा बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि तेलंगणा येथील नक्षली संघटनांशी थेट संपर्क होता. त्याच्या खोलीतून माओवादी साहित्य जप्त करण्यात आले आहे. माओवादी नेत्यांना भेटण्यासाठी तो जंगलात जात असे. तसेच त्याचे शहरातील सुमारे अर्धा डझन नेत्यांशी संबंध असल्याचेही तपासात आढळून आले आहे. पोलिसांनी सांगितले की, भागलपूर येथील विद्यापीठातील एका प्राध्यापकाचा नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचे तपासात आढळले आहे. प्राध्यापकाने हा आरोप फेटाळला.

Team Global News Marathi: