“उद्धव ठाकरे फोटोग्राफीमध्ये मशगुल होते तेव्हा राज ठाकरे… मनसेने लगावला उद्धव ठाकरेंना टोला

 

मुंबई | माहाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे मशिदींवरील भोंग्यांवरून आक्रमक झाल्यानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण रंगायला सुरूवात झाली आहे. राज ठाकरेंच्या औरंगाबाद येथील सभेपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंवर केलेल्या टीकेला मनसेच्या नेत्याकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

बाबरी पडली तेव्हा राज ठाकरे कुठे होते? असा खोचक सवाल मुख्यमंत्री ठाकरेंनी उपस्थित केला होता. या टीकेवरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.मुख्यमंत्र्यांची मेमरी इरेज झाली आहे म्हणून ते असले प्रश्न विचारत आहेत. जेव्हा उद्धव ठाकरे फोटोग्राफीमध्ये मशगुल होते तेव्हा राज ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांच्या समवेत राज्यभर दौरे करत होते. शिवसेना वाढवण्याचं काम करत होते, असा टोला देखील संदीप देशपांडे यांनी लगावला आहे.

राज ठाकरे यांनी विनंती केली म्हणून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना कार्याध्यक्ष केले हे उद्धव ठाकरेंनी विसरू नये, अशी टीका संदीप देशपांडे यांनी केली आहे. तर उद्धव ठाकरे नवपुरोगामी झाले असल्याचंही संदीप देशपांडे म्हणाले आहे. या टीकेला आता शिवसेना काय प्रतिक्रिया देतायत हे पाहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: