उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे विचार शिवसेनेत घुसवले

 

निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार ठाकरे आणि शिंदे गटाला शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह वापरता येणार नाही. त्यामुळे दोन्ही गटाला दुसऱ्या चिन्हाचा पर्याय शोधून निवडणूक लढवावी लागणार आहे. आयोगाच्या या निर्णयाचा सर्वांनाच धक्का बसला असून राजकीय वर्तुळातून यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर टीका करत म्हणाले की, “उद्धव ठाकरेंनी शिवसेनेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे विचार घुसविल्यामुळे शिवसेनेचे चिन्ह गोठवण्याची वेळ आली. अजूनही वेळ गेलेली नाही. त्यांनी आता तरी सुधरावे.” अशी टीका त्यांनी केली.

“हा बाळासाहेबांचा शिवसैनिक असून बाळासाहेबांनी त्यांना स्वाभिमान शिकवला आहे. शिवसैनिक बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन चालत आहे. जर या शिवसैनिकाला कोणी जय शरद पवार, जय सोनिया गांधी, जय राहूल गांधी असा विचार शिकवण्याचा प्रयत्न केला, तर अशी परिस्थिती निर्माण होणारच.” असेही त्यांनी म्हटले.

धनुष्यबाण’ हे चिन्ह गोठविल्याने शिंदे आणि ठाकरे गटाला निवडणूक आयोगाकडे प्रत्येकी ‘तीन’ पर्यायी चिन्हे सादर करावे लागणार आहेत. त्यातील एका चिन्हाला निवडणूक आयोग मान्यता देणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोग आजच (१० ऑक्टोबर) दोन्ही गटांना नाव आणि चिन्ह देण्याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. या निर्णयाकडे महाराष्ट्रासह संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून दोन्ही गटांना त्यांच्या मनासारखे चिन्ह मिळते का? हे महत्त्वाचे ठरणार आहे.

Team Global News Marathi: