उद्धव ठाकरेंनी आपल्याला धोका दिला; त्यांना जमीन दाखवा, अमित शाह आक्रमक

 

मुंबई- केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शाह सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत.
त्यांनी सकाळी लालबागचा राजाचं दर्शन घेतलं. त्यानंतर मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्या वांद्रे पश्चिम येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडपात गणरायाचे दर्शन घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यातील गणरायाचे दर्शन घेतले.गणरायांचे दर्शन घेतल्यानंतर अमित शाह यांनी मुंबईत भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी अमित शाह यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.

तुम्हाला माहिती आहे, उद्धव ठाकरेंनी आपल्याला धोका दिला. शिवसेनेनं पाठीत खंजीर खुपसलं. त्यामुळे उद्धव ठाकरेंना जमीन दाखवा, असं अमित शाह म्हणाले. भाजपने कधीच छोटा भाऊ-मोठा भाऊ म्हटले नाही. राजकारणात काहीही करा, पण धोका सहन करु नका. जे धोका देतात त्यांना योग्य शिक्षा झालीच पाहिजे. प्रत्येक कार्यकर्ता मैदानात उतरला पाहिजे. तुम्ही नरेंद्र मोदींच्या नावावर, देवेंद्र फडणवीसांच्या कामावर मतं मागितली आणि जिंकून आले. तुम्ही जनतेचा विश्वासघात केला असल्याचे शाह यांनी सांगितले. मुंबईतल्या राजकारणावर वर्चस्व केवळ भाजपचं असावे, असं विधानही अमित शाह यांनी केलं आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यातील राजकारण तापणार असल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गणपतीच्या दर्शनासाठी मुंबईत आलेत. परंतु मुंबईचं महत्व कसं कमी होईल? मुंबईवर बेगडी प्रेम दाखवायचं. मुंबईतील अनेक कार्यालयात अहमदाबादला नेले. याचा अर्थ मराठी माणूस, मुंबईचं महत्त्व कमी करून अहमदाबादचं महत्त्व वाढवण्याचा प्रकार सुरू आहे. परंतु महाराष्ट्राने सातत्याने यावर मात केली आहे असं शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी सांगितले.

Team Global News Marathi: