‘त्यांच्या’वर कारवाई होणारच, आदित्य ठाकरेंनी बंडखोरांना ठणकावलं

 

मध्यावधी निवडणुकांची चर्चा असून गुजरातसोबत महाराष्ट्रात देखील निवडणुका होण्याची शक्यता वाटते आहे. आम्ही निवडणुकांसाठी नेहमीच तयार असतो. मात्र जे जन्म पक्षासोबत असं काही करू शकतात ते कर्म पक्षातही तसंच करण्याची खात्री आहे. जे आमचा पक्ष पोखरून समोरच्या पक्षात गेले आहेत त्या पक्षाला मी शुभेच्छा देतो. मी समोरच्या पक्षाला एवढंच सांगतो की त्यांनी सावध रहावं, असा इशारा युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.

तसंच निवडणुका झाल्यास आम्ही तयार आहोत, जनता तयार आहे. शिवसेना मोठ्या ताकदीसह या विधानसभेत येईल आणि भगवा फडकवेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. विधानसभेत मतदानावेळी ज्यांनी व्हिपच्या विरोधात ज्यांनी मतदान केलं त्यांच्यावर कारवाई होणारच, अशी स्पष्ट आणि ठाम भूमिका युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी आज विधिमंडळाच्या बाहेर पत्रकारांसमोर आपली भूमिका मांडली.

मतदानावेळी पक्षाच्या व्हिपच्या विरोधात मतदान करणारे हे समोरच्यांनी पळवून नेलेले आहेत. सध्या ते बबलमध्ये आहेत. सुरक्षेत आहेत. कधी सूरत, कधी गुवाहटी, कधी गोवा, आता सुरक्षेत मुंबईत आहेत. इथून पुढे कुठे जातील ते माहीत नाही. मात्र जेव्हा ते मतदार संघात जातील तेव्हा ते मतदारांना काय सांगतील. आणि मतदार त्यांना काय सांगतील.

तसेच मतदारांच्या मनात काय आहे हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. मुंबईत जेव्हा इमारत पडली तेव्हा तिथले आमदार गुवाहटीमध्ये धम्माल करत होते. अनेक भागात वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत. तेव्हा आमदार तिथे नव्हते. आता मतदार त्यांना काय सांगणार, ते कुठल्या बाजूला आहे ते त्यांना कळेल, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

Team Global News Marathi: