“त्यांचं वय पण झालंय त्यामुळे आता त्यांनी रिटायर व्हायला हवं” – मनसे

 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातील आदर्श होते. तर तर नितीन गडकरी हे सध्याचे आदर्श आहेत, असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदवीदान समारंभात राज्यपाल बोलत होते.

यावेळी भाषण करताना राज्यपालांनी केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नितीन गडकरी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी केली. आता यावरून चांगलेच राजकारण तापले असून मनसेने देखील राज्यपालांवर सडकून टीका केली आहे.

राज्यपालांच्या या विधानावर मनसेचे नेते वसंत मोरे आक्रमक झाले आहेत. “राज्यपाल नेहमीच बेताल वक्तव्य करत आहेत, त्यांना त्यांचे वरिष्ठ का सांगत नाहीत. ते नेहमी कळी लावायचे काम करतात. जातीला धरूण बेताल वक्तव्य करणं त्यांनी बंद करायला हवं. त्यांचं वय पण झालं आहे त्यामुळे आता त्यांनी रिटायर व्हायला हवं”, अशा शब्दांत मोरे यांनी राज्यपालांच्या विधानाचा समाचार घेतला.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले, “आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो. तेव्हा आम्हाला आमचे शिक्षक विचारायचे तुमचा आवडता नेता कोण आहे? तेव्हा ज्यांना सुभाषचंद्र बोस आवडायचे, ज्यांना गांधीजी आवडायचे आणि नेहरू आवडायचे ते त्यांची नावे घ्यायची.

मला आता असं वाटतं तुम्हाला कोणी विचारलं तुमचा आयकॉन कोण? तुमचा आवडता नेता कोण? तर तुम्हाला बाहेर जायची गरज नाही. महाराष्ट्रातच तुम्हाला भेटून जातील. शिवाजी महाराज तर जुन्या युगातील आहेत. मी आधुनिक युगाबाबत बोलत आहे. इथेच मिळतील. डॉ. आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला सर्व इथेच मिळून जातील”

Team Global News Marathi: