राज्यपाल कोश्यारी यांनी शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्याला गुणरत्न सदावर्तें यांचा पाठिंबा

 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. ‘छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे जुन्या काळातील आदर्श होते.’ असे ते म्हणाले. राज्यपालांच्या विधानानंतर नवीन वाद निर्माण झाला असून राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. काही संघटना आणि राजकीय पक्षांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांना हटवण्याची मागणी केली.

मात्र, राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना एसटी कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी राज्यपालांच्या विधानाचे समर्थन केले आहे. “काही पराभूत मनोवृत्तीचे लोकं राज्यापालांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढत आहेत.” असे ते म्हणाले.

गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, “राज्यपालांच्या वक्तव्याचा काही पराभूत मनोवृत्तीचे लोकं चुकीचा अर्थ काढत आहेत. त्या पराभूत मनोवृत्तीच्या लोकांची नावे घेण्याची गरज नाही. या लोकांनी राज्यपालांचे भाषण व्यवस्थितपणे ऐकावे. त्यांचे भाषण हे तात्वीक आहे.

शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेऊन आज नितीन गडकरींसारखे अनेक नेते काम करतात. त्यामुळे शिवरायांचा आदर्श समोर ठेऊन त्यापद्धतीने काम करा, असे म्हणणे कोणताही गुन्हा नाही. असा आक्षेप घेणारे पराभूत मानसिकतेतून अशी टीका करतात. राजकीय भूक भागवन्यासाठी त्यांच्याकडून टीका केली जात आहे.” असेही ते म्हणाले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी “तुमचा आदर्श कोण आहे, असे जेव्हा पूर्वी विचारले जात असे तेव्हा, ‘जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस आणि महात्मा गांधी’ अशी उत्तरे दिली जायची. परंतु, महाराष्ट्रात तुम्हाला आदर्श शोधण्याची गरज नाही, कारण इथे खूप आदर्श आहेत. छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातील, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नितीन गडकरी हे नव्या काळातील आदर्श आहेत.” असे ते म्हणाले होते. त्यांनी केलेल्या या वक्तव्यावरून राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे.

Team Global News Marathi: