टीव्ही 9 मराठीचे पत्रकार पांडुरंग रायकर यांचे कोरोनामुळे निधन;अजित पवारांनी चौकशीचे तर राजेश टोपेनी दिले मदतीचे आश्वासन

टीव्ही 9 या वृत्तवाहिनीचे पुणे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांचे कोरोनामुळे दुर्दैवी निधन झाले. रायकर हे 42 वर्षांचे होते. बुधवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रायकर यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर गेले काही दिवस खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

रायकर हे मूळचे नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील रहिवासी होती. ईटीव्ही मराठी, एबीपी माझा या वृत्तवाहिन्यांसाठी त्यांनी पत्रकार म्हणून काम केले होते. रायकर हे सध्या टीव्ही 9 या वृत्तवाहिनीसाठी काम करीत होते. पांडुरंग रायकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले आणि आई-वडील असा परिवार आहे

पांडुरंग रायकर यांना २० ऑगस्टला थंडी आणि तापाचा त्रास झाला. त्यानंतर डॉक्टरांकडे त्यांच्यावर उपचार सुरु होते. २७ ऑगस्टला त्यांनी कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. त्यानंतर पुण्यातून ते आपल्या मूळ गावी कोपरगावला गेले.


https://twitter.com/TV9Marathi/status/1301070156391538688?s=19

गावी गेल्यानंतरही पांडुरंग यांना त्रास झाल्यामुळे त्यांची पुन्हा अँन्टीझेन चाचणी करण्यात आली. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. रविवारी ३० ऑगस्टला पांडुरंग रायकर यांना कोपरगावहून पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. पुण्यातील जम्बो हॉस्पिटलमध्ये पांडुरंग यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र परिस्थिती खालावत गेली. जम्बो हॉस्पिटलमधून खासगी हॉस्पिटलला शिफ्ट करण्यासाठी त्यांना कार्डिअक रुग्णवाहिकेची गरज होती. पण व्हेटिंलेटर खराब असल्याने रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही.

रात्री उशिरापर्यंत स्थानिक पत्रकारांच्या मदतीने पांडुरंगला रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्याचे प्रयत्न सुरु होते, मात्र त्यात यश आलं नाही. पांडुरंग यांची ऑक्सिजन पातळी खाली येत होती. पहाटे ५ च्या सुमारास दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून रुग्णवाहिका उपलब्ध झाली पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. कार्डिअक रुग्णवाहिका जम्बो हॉस्पिटलला पोहचेपर्यंत पांडुरंग रायकर यांची प्राणज्योत माळवली होती. वेळेवर रुग्णवाहिका आणि हॉस्पिटलला बेड मिळाला नसल्याने पांडुरंगचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे.

या प्रकरणी भाजपा आमदार नितेश राणे यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या गलथान कारभारामुळे पांडुरंगचा जीव गेला. कोरोना काळात नि:स्वार्थी भावनेने सेवा देणारे पत्रकारही सुरक्षित नाहीत. जम्बो कोविड सेंटरचे उद्धाटन करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घ्या तीच खरी श्रद्धांजली ठरेल असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान या प्रकरणाची दखल घेऊन उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी विभागीय आयुक्तांना चौकशीचे आदेश देत अहवाल मागितला आहे. तसेच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही पुणे जिल्हाधिकारी, पालिका आयुक्तांना चौकशी करण्यास सांगितलं आहे असं म्हणाले. त्याचसोबत कोविड काळात काम करताना कोणी दगावला तर त्याला मदत केली जाईल. ते जीव धोक्यात घालून काम करत आहेत. पांडुरंगच्या कुटुंबाला विम्याची मदत मिळवून घ्यायचा प्रयत्न करु असं आश्वासन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: