टी.व्ही मिडीयाने थोडीशी नजर शेतकऱ्यांकडे ही वळवावी-शेतकरी पुत्र विश्वनाथ शिंदे यांची मागणी

टी.व्ही मिडीयाने थोडीशी नजर शेतकऱ्यांकडे ही वळवावी-शेतकरी पुत्र विश्वनाथ शिंदे मांजरमकर यांची मागणी

दीड-दोन महिने होत आले. एक चित्रपट अभिनेता सुशांत सिंह राजपूत टी. व्ही.चा पडदा आणि वृत्तपत्रांचे रकाने भरण्यात यशस्वी झालाय. एकीशी प्रेम, दुसरीशी लफडं, आणि तिसरीशी बिझनेस. चौथी लिव्ह अ‍ॅण्ड रिलेशनशिपमध्ये राहून त्याचं अकौंट झिरो करते. म्हणे गुणी कलावंत. हत्या की आत्महत्या यावर दोन महिने चर्वित – चर्वण चाललंय.

कुणाचाही जीव जाणं वाईटच. त्या सुशांतच्या आत्महत्येचं की कथित हत्येचं मी समर्थन करणार नाही. कारण प्रत्येकाला आपला जीव प्यारा असतो. पण सव्वाशे कोटींच्या देशात एक सुशांतच आत्महत्या करतो काय? 33000 शेतकर्‍यांनी शेता-बांधावरच्या झाडांना लटकवून आपला जीवन प्रवास संपवला. त्यांची मुलं-बाळं उघड्यावर पडली. किती जणांनी मेणबत्ती मोर्चे काढले? किती जणांनी शासनाला जाब विचारला? किती निर्माते उपाशी झोपले?

विधवा पत्नी, अनाथ मुलं असहाय्य आई-वडील असा परिवार उघड्यावर पडला. चार्‍यावाचून ती मुकी जनावरे तडफडून मेली. बँक अधिकारी कर्जाच्या वसुलीसाठी दहाव्यालाच हजर. अशावेळी त्या आत्महत्याग्रस्त कुटुंबाने न्याय मागायचा कुणाकडे? सुशांत सिंह राजपूतकडे तर कोट्यावधी रुपये होते. त्याच्या प्रेमप्रकरणांमुळे अनेक जणींनी त्याला लुटलं. इथं शेतकर्‍याला निसर्ग आणि शासन व्यवस्था लुटते. त्याच्यासाठी कधी तरी अश्रू ढाळणार की नाही?

मी ‘नाम’ संस्थेच्या नाना पाटेकर व मकरंद अनासपुरेंचं अभिनंदन करतो. त्यांनी हजारो विधवांना रोखीने – चेकने अर्थसाह्य करून त्यांच्या जीवनात थोडा आनंद पेरण्याचा प्रयत्न केला. सुशांत सिंग राजपूत कोट्यावधी रुपये कमावून प्रेम-लफडी करून मानसिक दिवाळखोरीत जात आत्महत्या करत असेल तर त्याला एक न्याय व शेतकर्‍याला दुसरा न्याय हे कसं काय?

म्हणजे, पडद्यावर नाचणारा, प्रेम- लफडी करून ‘पेज थ्री’ पार्ट्या झोडपणारा ‘माणूस’?, दररोज 12-14 तास काबाडकष्ट करून तुटलेल्या – फुटलेल्या घरात राहून आपल्या पत्नी-मुलांबाळांचं संगोपन करू पाहणारा ‘कचरा’? कुणीही यावे ‘डस्टबिन’ मध्ये टाकावे? या समाजव्यवस्थेचीच चीड येते.
सध्या कोरोनाचा महाभयंकर काळ सुरू आहे.

या चित्रपटसृष्टीलाच नव्हे तर संपूर्ण भारताला दोन वेळचं जेवू कोण घालतोय? शेतकरी! तो राबतोय म्हणून आपण खातोय! तो घरात बसला असता तर आपलाही ‘सुशांत’ झाला असता. त्याच्या पदरात काय पडतंय? 10 रु. किलो टोमॅटो, 5 रु. कि. कांदे, 10 रु. कि. बटाटे, 2 रु. मेथीची जुडी, 2 रु. कोथिंबीर जुडी, 18 रु. लि. दूध. चार टेम्पो शेतकर्‍याचा माल विकून जेवढा पैसा येईल, तेवढ्या पैशात ‘सुशांत’ रोज सकाळी नाश्ता करायचा.

आणि आपल्या मैत्रीणींनाही खावू घालायचा. नाश्ता, जेवण जेव्हा संपलं तेव्हा त्यांनी टांग वर केली आणि यानेही आपला बिस्तरा गुंडाळला. टी. व्ही. मिडीया, वृत्तपत्र मिडीयाने आपली नजर थोडी शेतकर्‍यांच्या शेताबांधाकडे वळवावी. विदारक चित्र आहे. कदाचित एखादा पत्रकारसुद्धा आत्महत्या करेल.

ग्लोबल न्युज नेटवर्क: