‘तुम्हीही राज ठाकरेंच्या घरी जाणार आहात का?’; अजित पवार म्हणाले की,

 

राज्यात सत्तापालट झाल्यानंतर शिंदेगट आणि भाजपाच्या नेत्यांकडून मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या सातत्याने भेटीगाठी घेतल्या जात आहेत.याचदरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील गुरुवारी ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंच्या घरातील गणपती बाप्पांचे दर्शन घेतले व ठाकरे यांच्याशी जवळपास ४० मिनिटे चर्चा केली. मुंबई, ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या चर्चेला महत्त्व आहे. राजकीय चर्चा झाली नाही, जुन्या आठवणींना उजाळा दिला, असे स्पष्टीकरण शिंदे यांनी माध्यमांकडे दिले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या या भेटीवर विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरेंच्या घरी विविध नेते जाताय, असा प्रश्न पत्रकारांनी अजित पवारांना विचारला. यावर आपली भारतीय संस्कृती आणि परंपरा आहे. आपण अनेकांच्या घरी जाऊन भेट घेतो. त्यात वाईट वाटायचं कारण काय?, असं अजित पवार म्हणाले.

अजित पवारांना तुम्हीही राज ठाकरेंच्या घरी जाणार आहात का?, असा सवाल विचारला. त्यावर सध्यातरी माझा काही असा प्लॅन नाहीय. परंतु राज ठाकरे आणि माझी अनेकदा भेट झालीय. आम्ही काही एकमेकांचे शत्रू नाही. आमचे राजकीय मतभेद असू शकतात, मात्र मैत्रिचे संबंध देखील असतात, असं अजित पवारांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं. त्यामुळं येत्या दिवसात अजित पवार दर्शनासाठी राज ठाकरे यांच्या घरी भेट देऊ शकतात.

Team Global News Marathi: