परिवहन मंत्री अनिल परब यांच्या प्रत्येक प्रकरणाची ED करणार स्वतंत्र चौकशी

 

१०० कोटी हप्ता वसुलीच्या चौकशी प्रकरणी ED ने दोन दिवसांपूर्वी शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांना नोटीस बजावली होती. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकचं खळबळ उडाली होती. त्यातच आता परब यांच्या सर्व प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्यात येणार असून त्यासाठी आस्ते कदम टाकत प्रत्येक प्रकरणासाठी स्वतंत्रपणे त्यांना पाचारण केले जाणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

मंगळवारी चौकशीसाठी हजर राहण्याच्या ईडीच्या सूचनेला न जुमानता परब यांनी दोन आठवड्यांची मुदत मागवून घेतली. तसेच नेमक्या कोणत्या कारणासाठी चौकशी करायची आहे, त्याबाबत विचारणा केली आहे. त्यामुळे परब ही माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याप्रमाणेच ईडीची चौकशी लांबणीवर टाकतील, अशी शक्यता आहे, त्यामुळे त्यांच्याकडील चौकशी त्याच पध्दतीने दीर्घकाळ चालविली जाणार आहे.

मंत्री परब यांच्याविरुद्ध सध्या ईडीकडे तीन वेगवेगळ्या प्रकरणाच्या तक्रारी आहेत. त्यात मुंबई पोलिसांचे १०० कोटी वसुली प्रकरण व सचिन वाझेने एनआयए कोठडीतून त्यांच्याबद्दल केलेला उल्लेख, त्याचप्रमाणे परिवहन विभागातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी एका अधिकाऱ्याने दिलेली तक्रार आणि दापोली येथील मालमत्ता व अवैध परवाने, बांधकामाबद्दल भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिलेल्या तक्रारींवर चौकशी केली जाणार आहे. मात्र या तीनही प्रकरणात परब यांच्या थेट सहभागाप्रकरणी एकही पुरावा नाही. परिवहन विभागातील कथित बदल्यांच्या घोटाळ्याप्रकरणी नाशिक पोलिसांनी चौकशी करून त्यांना क्लीन चिट दिली आहे.

Team Global News Marathi: