सप्टेंबरमध्ये कोरोना संसर्ग संदर्भाचे नियम अधिक कडक होणार, पालकमंत्री अस्लम शेख यांचा इशारा

 

मुंबई | राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागच्या मार्च महिन्यापासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता मात्र रुग्णसंख्या कमी होत असल्याचे चित्र पाहता लॉकडाऊनमध्ये वेळोवेळी शिथिलता देण्यात आली होती. आता पुन्हा एकदा निर्बंध कडक करण्यात येणार असल्याचे संकेत मंत्री अस्लम शेख यांनी पत्रकार माध्यमांशी बोलताना दिले आहे.

करोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली असून या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ती वेळीच थोपवून धरता यावी म्हणून उपाययोजना सुरु केल्या आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत देखील राज्यातील करोना संसर्गाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. याबाबत माहिती देताना सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत तर करोना बाधित रुग्णांची संख्या वाढली तर निर्बंध कडक करण्यात येतील, अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे.

करोना नियंत्रणात येत नसल्यास महाराष्ट्राच नाईट कर्फ्यूच्या पर्यायाचा विचार करण्याची सूचना केंद्र सरकारने राज्य सरकारला दिली होती. त्यानंतर राज्य सरकारने देखील राज्यातील ज्या भागांमध्ये करोनाच्या रुग्णवाढीचा दर अधिक आहे अशा भागांमध्ये नाईट कर्फ्यू लावता येतो का, याबाबत विचार सुरू केला होता.

मात्र सध्या तरी नाईट कर्फ्यु, संचारबंदी किंवा जमावबंदीची गरज नसल्याचे अस्लम शेख यांनी सांगितले. टास्क फोर्सने सांगितल्यानुसार सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत करोनाची रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे. जर या अंदाजानुसार रुग्णसंख्या वाढली तर निर्बंध कडक करण्याची गरज आहे, असेही शेख म्हणाले. मात्र रुग्णसंख्या वाढत राहिली तर पुन्हा एकदा नागरिकांना लॉकडाऊनला सामोरे जावे लागणार आहे.

Team Global News Marathi: