ठराव पाठवून बराच काळ झालाय, निर्णय घ्या! विधान परिषदेवर 12 आमदारांची नियुक्ती

विधान परिषदेवरील 12 आमदारांच्या नियुक्तीची शिफारस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सरकारकडून करून आठ महिने लोटले. मात्र त्यावर अद्यापही निर्णय न झाल्याने आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यपालांची भेट घेतली. या भेटीदरम्यान राज्यपालांसोबत राज्याच्या महत्त्वाच्या विषयांबाबत चर्चा झालीच. शिवाय 12 आमदारांच्या नियुक्तीचा ठराव पाठवून बराच काळ लोटला. त्यामुळे यावर तातडीने निर्णय घ्या, अशी आठवण राज्यपाल कोश्यारी यांना करून देण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या भेटीनंतर सांगितले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे 6 नोव्हेंबर 2020 रोजी 12 आमदारांच्या नियुक्तीची यादी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सोपविण्यात आली होती. यासंदर्भात महाविकास आघाडी सरकारकडून वारंवार आठवण करण्यात आली. उच्च न्यायालयानेही राज्यपालांना आदेश देता येणार नाही असे सांगतानाच संविधानिक जागा अनिश्चित काळासाठी रिक्त ठेवता येणार नाहीत, असे स्पष्ट केले. मात्र त्यानंतरही राज्यपालांनी यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे राज्यपाल कोश्यारी यांची वेळ घेऊन आज त्यांना 12 आमदारांच्या नियुक्तीच्या ठरावाचीही आठवण करून दिली.

विधान परिषदेत कमी आमदार

12 आमदारांच्या नियुक्तीबाबतच्या ठरावाविषयी विनंती करण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही बाब राज्यपालांसमोर मांडली. राज्यपालांनी कोणाच्याही नियुक्तीबद्दल आक्षेप नोंदवलेला नाही. कधी निर्णय घ्यायचा हा त्यांचा अधिकार आहे. मात्र आमदारांची नियुक्ती रखडल्याने परिषदेतील आमदारांची संख्या कमी आहे. त्यामुळे लवकरात लवकर यासंदर्भातील ठरावाला मान्यता द्यावी, अशी विनंती राज्यपालांना करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

पाऊस-पाणी, कोरोनावर चर्चा

राज्यपालांच्या भेटीदरम्यान त्यांना राज्याच्या परिस्थितीबाबतची माहिती द्यावी लागते. त्यानुसार त्यांना राज्यातील पाऊस, धरणांची स्थिती, मराठवाडा, चाळीसगाव येथील परिस्थितीची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. यासह राज्याच्या विविध विषयांवर राज्यपालांसोबत चर्चा करण्यात आली.

 

त्याचप्रमाणे राज्यातील कोरोनाची स्थिती आणि केंद्राने दिलेल्या इशाऱयाबाबतही माहिती देण्यात आली. यावेळी त्यांच्याकडूनही लोकांनी दहीहंडी, गणेशोत्सव अशा सणांदरम्यान गर्दी करू नये, असे मत नोंदविण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: