टोल नाक्यावर वारकऱ्यांकडून टोल वसूली कर्मचाऱ्यांवर गुहा दाखल

 

सोलापूर | सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दौंड तालुक्यातील पाटस येथील टोल प्लाझा कंपनीकडून आषाढी वारी निमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांकडून टोल आकारणी केल्याप्रकरणी टोल प्लाझा कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर अजयसिंग ठाकूर यांच्यासह चार जणांवर यवत पोलीस स्टेशनला महाराष्ट्र शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाटस टोल प्लाझा कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर अजयसिंग ठाकूर , टोल वसुली कर्मचारी बालाजी वाघमोडे,टोल कंपनीचे अधिकारी सुनील थोरात व विकास दिवेकर अशी गुन्हे दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की,महाराष्ट्र शासनाने ७ जुलै रोजी आषाढी वारी च्या निमित्ताने पंढरपूरकडे जाणाऱ्या प्रमुख पालखी व वारकरी तसेच भाविकांच्या वाहनांना टोलमध्ये सूट देण्याचा आदेशाचे परिपत्रक काढले होते.

मात्र तरीही पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाटस येथील टोल प्लाझा कंपनीकडून आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकरी व भाविकांची वाहने अडवून त्यांच्याकडून टोल आकारण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. महाराष्ट्र शासनाने काढलेल्या परिपत्रकाचे उल्लंघन पाटस टोल प्लाझा कंपनीकडून करण्यात आल्याने यवत पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी फिर्याद दिल्याने पाटस टोल प्लाझा कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर अजय ठाकूर व इतर तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Team Global News Marathi: