मुंबई | आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक दुपारी होणार असून मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर बैठक पार पडणार आहे. आजच्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रत्यक्ष उपस्थित राहणार का? याकडे देखील लक्ष लागले आहे. दरम्यान आजच्या बैठकीत काही महत्वाचे निर्णय होऊ शकतात. या बैठकीत ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरु करण्याच्या निर्णयावर पुनर्विचार होऊ शकतो. शाळा सुरु करण्याबाबत आजच्या बैठकीत महत्वाचा निर्णय होऊ शकतो.
मागच्या काही दिवसात ओमायक्रॉनचे काही रुग्ण राज्यात देखील सापडले आहेत. कोरोनाची आकडेवारी जरी आटोक्यात असली तरी ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरु करण्याचा निर्णय तुर्तास स्थगित केला जाऊ शकतो. यासंदर्भात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं होतं की, स्थानिक पातळीवर निरीक्षण करुन शाळांबाबत निर्णय घेतला जाईल. मुंबई, पुण्यात 15 डिसेंबर पासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
ओमाक्रॉनच्या पार्श्वभूमीवर याठिकाणच्या प्रशासनाकडून परिस्थितीचं निरीक्षण केलं जात आहे. टास्क फोर्ससोबत चर्चा करुन शाळांची नियमावली बनवली आहे. इथुन पुढेही स्थानिक प्रशासकीय यंत्रणेकडून परिस्थितीचा आढावा घेऊन गरज पडल्यास पुढील निर्णय घेतले जातील, असं गायकवाड यांनी म्हटलं होतं. तसेच एसटी आंदोलन तथा ओबीसी आरक्षणाला दिलेल्या स्थगितीवर चर्चा होण्याची शल्यता वर्तवली जात आहे