शेवटच्या श्वासापर्यंत पंकजा मुंडे भाजपमध्येच राहणार – सुधीर मुनगंटीवार

 

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात खासदार प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्यामुळे नाराज असलेल्या मुंडे भगिनींनी मुंबई कार्यालयात आपल्या समर्थकाशी संवाद साधला होता. यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी जमलेली दिसून आली होती. यावेळी पंकजा मुंडे यांनी आपण भाजपात राहणार असल्याचे जाहीर केले होते. तसेच नाव न घेता फडणवीसांना टोला लगावला होता.

यावर आता भाजपा नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या मंत्रीमंडळात बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना स्थान नाकारण्यात आल्यानंतर नाराज झालेल्या कार्यकर्त्यांची पंकजा मुंडे यांनी मुंबईत समजूत काढली. कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना पंकजा मुंडे यांनी जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत धर्मयुद्ध टाळण्याचा प्रयत्न करणार असा इशारा दिला. परंतू पंकजा मुंडे या भाजपमध्येच राहतील असा विश्वास आमदार आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.

पुढे बोलतां मुनगंटीवार म्हणाले की, पंकजा ताईंना पक्षाने राष्ट्रीय स्तरावर सचिवपदाची जबाबदारी दिली आहे. त्यांच्या अनुभवाचा पक्षाला फायदाच होणार आहे. प्रीतम ताईंना मंत्रीपद न मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांची नाराजी असणं स्वभाविक आहे. त्यामुळे त्यांची समजूत काढण्यासाठी पंकजा ताईंनी तसे शब्द वापरले असतील. परंतू शेवटच्या श्वासापर्यंत पंकजा ताई भाजपमध्येच राहतील त्या कोणताही वेगळा निर्णय घेणार नाहीत”, असं मुनगंटीवार म्हणाले.

Team Global News Marathi: