कर्नाटकात ‘या’ प्रवाशांना ‘आरटीपीसीआर’ची सक्ती तर ‘यांना’ सवलती

 

कर्नाटक | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे रूग्ण सापडू लागल्याने कर्नाटक राज्य सतर्क झाले असून शासनाने सीमा तपासणी पथके सज्ज केली आहेत. कर्नाटक राज्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आरटीपीसीआर अहवाल निगेटिव्ह असणे बंधनकारक केले आहे. परंतु सीमाभागातील नागरिक तसेच कर्नाटक राज्याबाहेर पुढील राज्यांना जाणाऱ्या प्रवाशांना सवलत देण्यात आली आहे. या प्रवाशांच्या रहिवाशी पुराव्यांची खातरजमा करून कर्नाटकात कुठेही न थांबण्याच्या अटीवर त्यांना प्रवेश देण्यात येतो.

गेली दोन वर्ष कोरोना विषाणूने जगभर थैमान घातले आहे. आता काहीशी रुग्ण संख्या घटत असतानाच नव्या ‘ओमायक्रॉन’ या विषाणूचे संक्रमित रुग्ण देशात आढळून आले आहेत. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून कर्नाटक शासनाने राज्यात प्रवेश करणाऱ्या सर्वच प्रवाशांना आरटीपीसीआर निगेटीव्ह प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्र आणि कर्नाटक सिमेवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

महाराष्ट्र कर्नाटक आंतरराज्य सीमेजवळ कर्नाटकात राहणाऱ्या नागरिकांची महाराष्ट्रात वारंवार ये-जा असते. त्यामुळे अशा नागरिकांना सवलत देण्यात आली आहे. तसेच कर्नाटक व्यतिरिक्त केरळ, तामिळनाडू व गोवा अशा राज्यांसाठी जाणाऱ्या प्रवाशांना कर्नाटकात कुठेही न थांबण्याच्या अटीवर राज्यातील प्रवेशास सवलत देण्यात आली आहे.

Team Global News Marathi: