पणजी | काँग्रेसने पर्येंत याआधीच प्रतापसिंह राणे यांना उमेदवारी घोषित केली आहे.ते निवडणूक लढवणार नसतील तर त्यांनी पर्यायी उमेदवार द्यावा, असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम् यांनी केले आहे. पत्रकार परिषदेत चिदंबरम् एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले की, ‘पर्येतील उमेदवार एक- दोन दिवसात स्पष्ट होईल.
काँग्रेसने ज्येष्ठ राणे यांना उमेदवारी जाहीर केली असली तरी ते निवडणूक लढवणार आहेत की नाही, हे अजून स्पष्ट झालेले नाही. भाजपने पर्येंत त्यांची सून दिव्या राणे यांना तिकीट दिले आहे. काँग्रेसच्या सर्व उमेदवारांनी अर्ज भरल्यानंतरच मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराचे नाव जाहीर करण्यासंदर्भात चर्चा होईल. मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार निवडणुकीआधी जाहीर करावा की निकालानंतर निवड करावी, हे ठरणार आहे. याबाबतीत काँग्रेस योग्य तोच निर्णय घेईल, असे ते म्हणाले.
काॅंग्रेसच्या उमेदवारांनी शनिवारी पक्ष सोडणार नाही, अशी जी शपथ घेतली त्याबद्दल विचारले असता चिदंबरम् म्हणाले की, ‘याआधीचा पक्षांतराचा इतिहास पाहता उमेदवारांकडून शपथ घेणे गरजेचे होते. लोकांनी काँग्रेसवर विश्वास ठेवावा. आम्हाला राज्यात सरकार स्थापन करता यावे, म्हणून सर्व उमेदवारांकडून आम्ही शपथ घेतली.