तीन महिने वापरातील वास्तुचे उद्घाटन करुन मुख्यमंत्र्यांची फसगत कशाला?

 

1 मे म्हणजे महाराष्ट्र दिना पासून गेले तीन महिने जी वास्तु वापरात आहे त्या वास्तुचे उद्घाटन आज करुन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची फसगत व्हावी आणि कार्यक्रमाचे हसे व्हावे अशा प्रकारे दुर्दैवी वर्तन मुंबई महापालिकेने का करुन दाखवले ? असा सवाल भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी केला आहे.

आज लोकार्पण सोहळा पार पडला त्या एच पश्चिम महापालिका कार्यालयाची जुनी वास्तु अपुरी पडत असल्याने स्थानिक आमदार अँड आशिष शेलार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह तत्कालीन महापौर, पालिका आयुक्त, पालिका प्रशासनाकडे गेले सहा वर्षे सतत पाठपुरावा केला. या कामात स्थानिक नागरिक, स्थानिक संस्था यांनीही मोठा पाठपुरावा केला आहे.

या कार्यालयाचा ठराव मांडून त्यांसाठी निधी उपलब्धतेच्या बैठका, त्याचे टेंडर,प्रत्यक्ष काम व त्यामध्ये आलेल्या अडचणी याबाबत गेल्या सहा वर्षात 8 वेळा बैठका आमदार आशिष शेलार यांनी घेतल्या. या कार्यालयाच्या निर्माणात शिवसेनेचा कुठलाच सहभाग नव्हता. मग श्रेय घेण्यासाठी अट्टाहास कशाला? असा सवाल आमदार अँड आशिष शेलार यांनी केला आहे.

स्थानिक आमदार, एएलएम, संस्था, नागरिकांची मागणी पाठपुराव्याने ही नवी अद्ययावत इमारत उभी राहिली 1 में पासून ती लोकांसाठी खुली ही करण्यात आली. आता अचानक तीन महिने वापरात असलेल्या इमारतीचे लोकार्पण आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येते आहे.

या बाबत आमदार अँड आशिष शेलार म्हणाले की, महापालिकेतील सत्ताधारी श्रेय घेण्याच्या नादात काय करुन दाखवतील याचा नेम नाही. मुख्यमंत्र्यांना या इमारती बाबत वास्तव माहिती न देता अशा प्रकारे कार्यक्रम करुन महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी स्वतःचे हसे तर केलेच सोबत मुख्यमंत्र्यांची फसगत केली आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे.

उत्तर महाराष्ट्र दौऱ्यात जळगावला नियोजित कार्यक्रमात असताना काल रात्री दहा वाजता अचानक मला या कार्यक्रमाचे निमंत्रण दुरध्वनीवरुन मिळाले. त्यामुळे कार्यक्रमाला पोहचणे शक्य झाले नाही. मुख्यमंत्री आमच्या विभागात येत असताना त्यांच्या कार्यक्रमाला स्थानिक आमदार म्हणून गैरहजर असलो तरी जनमाणसात योग्य संदेश जावा म्हणून मी स्थानिक नगरसेवकां अलका केळकर यांच्या हातून पुष्पगुच्छ पाठवून त्यांचे स्वागत केले. पण हे मनाला न पटणारे आहे. मुंबई महापालिका श्रेय वादाच्या नादात हे असे जे काही करुन दाखवते आहे त्या बद्दल खेद वाटतो आहे.

मुख्यमंत्री पदाचा सन्मान राखणे आपले कर्तव्य नाही का? केवळ करुन दाखवलेच्या नादात तीन महिने लोकसेवेत असलेल्या इमारतीचे लोकार्पण रातोरात ठरवून मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणणे योग्य आहे का? असा सवाल आमदार अँड आशिष शेलार यांनी उपस्थितीत केला आहे. महापालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी करुन दाखवलेच्या नादात उद्या अचानक गेट वे आँफ इंडियाच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आयोजित करु नये म्हणजे मिळवले, अशा शब्दांत आमदार अँड आशिष शेलार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Team Global News Marathi: