लोकशाही मार्गाने जाणाऱ्यांना देशद्रोही आणि नक्षलवादी ठरविले जाते – काँग्रेस

लोकशाही मार्गाने जाणाऱ्यांना देशद्रोही आणि नक्षलवादी ठरविले जाते – काँग्रेस

ग्लोबल न्यूज: जगातील सर्वात मोठी व सर्वश्रेष्ठ लोकशाही अशी ओळख असलेल्या भारताची जागतिक लोकशाही निर्देशांकात होत असलेली घट अत्यंत चिंताजनक बाब आहे.भारताच्या लोकशाहीचा क्रमांक यात ९० वा असावा, हे अत्यंत गंभीर आहे. २०१४ पासून लोकशाही मुल्यांची, स्वायत्त संस्थांची मोठ्या प्रमाणात गळचेपी केली जात आहे. आज देशातील स्वायत्त संस्था सरकारच्या हातचे बाहुले बनवण्याचे काम झपाट्याने झाले आहे.

संविधानाला न जुमानता हुकुमशाही पद्धतीने राज्य कारभार चालला आहे. हे थांबवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी लोकशाही बळकट करण्याचा संकल्प प्रत्येक नागरिकाने करण्याची गरज आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

लोकशाही मार्गाने चालणाऱ्यांना देशद्रोही, नक्षलवादी ठरवले जात आहे. सरकारविरोधात करण्यात आलेली आंदोलने बदनाम करण्याचे काम केले गेले. शाहीन बागचे आंदोलन, जेएनयुमधील विद्यार्थी आंदोलन असो वा इतर कोणतेही आंदोलन, सरकारच्या विरोधात आवाज उठवणाऱ्यांना सरकारी यंत्रणांच्या मदतीने प्रचंड त्रास दिला जात आहे.

मागील सहा वर्षात देशद्रोहाचे खटले दाखल करण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. देशातील बहुसंख्य प्रसार माध्यमांनाही सरकारचे बटीक बनवण्यात आले आहे. सरकारविरोधात जनतेत कोणतीच माहिती जाऊ नये यासाठी सर्वकाही सुरु असून आपल्याला हवी तीच माहिती प्रसार माध्यमातून तसेच सामाज माध्यमातून पसरवली जात आहे.

मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात सद्या सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांना खलिस्तानी म्हणण्यापर्यंत मजल जाते हे लोकशाहीच्या दुरावस्थेचेच निदर्शक आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: