यंदा अनेकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे फिरवली पाठ

सध्या राज्यात वादात असलेल्या कोरोनाच्या संकटाशी सामना करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील अनेक दानशूर व्यक्तींना सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन केले होते. मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे राज्यातील मोठ्या दात्यांनी पाठ फिरवली आहे. परिणामी, पहिल्या टॉप २० देणगीदारांची यादी गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यानंतर कणभरही बदललेली नाही. राज्यावर एवढे मोठे संकट असताना, जानेवारी ते एप्रिल या गेल्या चार महिन्यांत मुख्यमंत्री सहायता निधीच्या कोविड फंडात फक्त ६ कोटी १४ लाख रुपये जमा झाले आहेत.

राज्यावर आणि संपूर्ण देशावर सर्वात मोठ्या आपत्तीचा सामना करीत असताना मुख्यमंत्री सहायता निधीसारख्या लोकांच्या सहभागातून उभारलेल्या गंगाजळीचा राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी महत्त्वाचा हातभार लागतो. यापूर्वी सन २०१५ च्या दुष्काळी परिस्थिती तसेच शेतकऱ्यांना थेट मदत करण्यासाठी राज्यातील मुख्यमंत्री सहायता निधीने महत्त्वाचा हातभार लावला.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्वायत्त ट्रस्ट असलेला हा निधी उद्योग समूह, धार्मिक संंस्था यांच्या देणग्यांमधून उभारण्यात येतो. गेल्या वर्षीपासून यात कोविड फंडाचे स्वतंत्र खाते तयार करण्यात आले आहे. यात सर्वाधिक देणगी देणाऱ्या टॉप २० देणगीदारांची नावे जाहीर करण्यात येतात. मात्र, गेल्या वर्षीच्या ३ सप्टेंबरनंतर एकही मोठा देणगीदार मुख्यमंत्री सहायता निधीत मोठी देणगी देण्यासाठी पुढे आलेला नाही. त्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्री कार्यालयाकडून मदतीसाठी आवाहन करण्यात आलेले आहे.

इथे करा मदतनिधी जमा
मुख्यमंत्री सहायता निधी (कोविड 19)
बँकेचे बचत खाते क्रमांक 39239591720
एसबीआय, मुंबई मुख्य शाखा 400023
शाखा कोड 00300
आयएफएससी कोड SBIN0000300

Team Global News Marathi: