मोदी विरुद्ध योगी चित्र उभं करण्यामागं भाजपाचा ‘हा’ मोठा प्लॅन, राष्ट्रवादीच्या या नेत्याचा आरोप !

मुंबई | मागच्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वाद असलेले चित्र पाहायला मिळत आहे. त्यात उत्तरप्रदेशच्या सर्व फेसबुक पेजवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे फोटो हटवल्यानंतर देशातील राजकारणात नव्या चर्चेला उधाण आले होते. मात्र आता यावर राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी हा कोरोनाचे अपयश झाकण्यासाठी भाजपचा प्लॅन असल्याचा आरोप केला आहे.

नवाब मलिक म्हणाले की, कोरोना काळात उत्तरप्रदेशमधील गंगा नदीत कोरोना बाधित लोकांचे मृतदेह फेकण्यात आल्याचे भयावह चित्र अख्खा देशानं आणि जगानं पाहिलं. यामुळे योगी सरकारच्या कारभाराचे वाभाडे निघाले. उत्तर प्रदेशातील हे अपयश झाकण्यासाठी मोदी विरुद्ध योगी असे चित्र उभे करण्याचा बाहरीत्या जनता पक्षाचा प्लॅन तयार असल्याचं नवाब मलिक यांनी सांगितले.

पुढे बोलताना मलिक म्हणाले की, चार वर्षांत योगींनी आपल्या कार्यकाळात फक्त राज्यात घृणा निर्माण केली आहे. सर्वसामान्य जनतेला फायदा होईल अशी एकपण योजना राबवण्यात आली नाही. कोरोनात फक्त सरकारच्या तिजोरीतील निधी मोठमोठ्या जाहिरातींवर खर्च करण्यात आला. उत्तर प्रदेशमध्ये आपला पराभव होणार हे भाजप आता समजून चुकली आहे. त्यामुळेच भाजप चिंताग्रस्त झाली आहे. उत्तर प्रदेशात भाजपाला पराभव पत्करावा लागणार हे निश्चित आहे असा टोला नवाब मलिकांनी भाजपाला लगावला आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गुरुवारी अचानक दिल्लीत पोहोचले. त्यांनी सायंकाळी चार वाजता गृह मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. याशिवाय, काही केंद्रीयमंत्री आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनाही ते भेटणार आहेत. आज ते पंतप्रधानांच्या निवासस्थानी नरेंद्र मोदी यांचीही भेट घेऊ शकतात. यानंतर ते भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनाही भेटू शकतात.

Team Global News Marathi: