‘हे सरकार एकाच विषयावर गंभीर आहे ते म्हणजे आमचे सरकार खंबीर आहे’; चित्रा वाघ यांची सरकारवर टीका

 

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील जवळा येथे काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला होता, या प्रकरणी मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याबाबत मुलीच्या वडिलांनी पोलिसात फिर्याद दिली होती. या पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी 25 ऑक्टोबर 2021 रोजी भेट घेत त्यांचे सांत्वन केले, सोबतच भारतीय जनता पार्टीच्या वतीने पीडितेच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत दिली. त्यानंतर अहमदनगर येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी महिला अत्याचाराच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला.

महाराष्ट्रातील कोणताही जिल्हा असो तिथे कायद्याचा धाक उरलेला नाही. राज्यात महिला अत्याचाराच्या घटना रोजच्याच झाल्या आहेत, त्यातच महिला अत्याचारावर साधी प्रतिक्रिया देखील राज्यकर्त्यांकडून दिली जात नाही. औरंगाबाद दौऱ्यावर असताना देखील मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादच्या तोंडोळी गावातील पीडितांची साधी भेटही घेतली नाही. माझे कुटुंब माझे जबाबदारी म्हणणारे राज्याचे मुख्यमंत्री हे कुटुंब प्रमुख म्हणून संबंधित पीडितेच्या घरच्यांच्या भेटीला जातील अशी आमची अपेक्षा होती, मात्र तसे झाले नाही. महिलांचे संरक्षण करता येत नसेल तर शासनाने आम्हाला सांगावे की, मुली – बाळींना घरातच बसवा, असा घणाघात भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी केला.

चित्रा वाघ म्हणाल्या की, अशा घटना घडल्यानंतर राज्यकर्त्यांकडून सर्रास म्हटले जाते की अशी प्रकरणे फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू मात्र, फास्ट ट्रॅक कोर्टात आधीचेच 1 लाख 60 हजार प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यामुळे निदान सरकारने अशा प्रकरणात गांभीर्य दाखवणे गरजेचे आहे. अशा प्रकरणात पीडितांना न्याय देताना वेळेचे बंधन असावे, मात्र तसे होताना दिसत नाही हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.

समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर अतिशय खालच्या पातळीवर समाज माध्यमातून टीका केली जाते हे अतिशय दुर्दैवी असल्याचे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. एका हिरोच्या मुलावर कारवाई झाली म्हणून त्याच्या संरक्षणार्थ सरकारमधील मंत्री पुढे येत आहेत, मात्र राज्यातील गोरगरिबांच्या मुली – बाळींवर अत्याचार होत असताना हे मंत्री गेली कुठे? असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे.

महाविकास आघाडी सरकारकडून भाजपवर आरोप केला जातो की, केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर करून सरकार पडण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू आहे, त्यावर उत्तर देताना वाघ म्हणाल्या की,’हे सरकार एकाच विषयावर गंभीर आहे ते म्हणजे आमचे सरकार खंबीर आहे’. भाजपच्या वरीष्ठ नेत्यांनी याआधीच सांगितले आहे की, आम्हाला सरकार पाडण्यात रस नाही त्यांचे तेच पडतील असेही चित्रा वाघ म्हणाल्या.

Team Global News Marathi: