या सर्व पत्रकारांवर दंगलखोरीचे, देशद्रोहाचे आरोप लावणे बरोबर नाही – संजय राऊत

सामनाचे संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज आपल्या अग्रलेखातून भारतीय जनता पक्षाची चाटुगिती करणाऱ्या पत्रकारांचा खरपूस समाचार घेतला आहे. भारतातील पत्रकारिता इतकी हतबल व लाचार कधीच झाली नव्हती. चांगल्याला चांगले आणि वाईटाला वाईट म्हणण्याची आपली परंपरा आहे. ‘सत्यमेव जयते’ हे आपले बिरुद आहे, पण निवडणूक प्रचारात थापा मारून लोक सत्तेवर येतात. असत्याचा रोज जय होतोय.

मात्र एक शेतकरी पोलिसांच्या गोळीबारात मेला की अपघातात? यावर कोर्टमार्शल करून पत्रकारांना देशद्रोहाच्या वधस्तंभावर लटकविले जात आहे. पंतप्रधान मोदी हे कधीकाळी पत्रकारांचे मित्र होते. पत्रकारांनीच मोदींना शिखरावर नेले. आपल्या जुन्या मित्रांसाठी मोदी दोन अश्रू ढाळतील काय?, असा सवाल त्यांनी आजच्या सामना अग्रलेखातून संरकरला आणि केंद्र सरकारची चाटूगिरी करणाऱ्या पत्रकारांना विचारला आहे.

पुढे ते लिहितात की, देशातील अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या घटना वारंवार घडत आहेत. लोकशाहीच्या प्रपृतीसाठी ते चांगले नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही व एखाद्याने कोणताही आगापीछा नसताना दुसऱ्यावर शेणफेक करावी, हे काही अभिव्यक्ती स्वातंत्र्यात बसत नाही. अर्थात, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा कुणी अतिरेक केला म्हणून त्यास देशद्रोही ठरवून फासावर लटकविता येणार नाही.

प्रजासत्ताकदिनी एका शेतकऱ्याचा पोलीस गोळीबारात मृत्यू झाल्याचे ‘ट्विट’ राजदीप सरदेसाई, मृणाल पांडे, शशी थरूर व अन्य तीन पत्रकारांनी केले. त्यावर सरकारने म्हणजे दिल्ली पोलिसांनी कडक कारवाई केली. हे सर्व लोक देशद्रोही, दंगलखोर, अफवा पसरवून गुजराण करणारे आहेत़ असे कठोर कायदे लावून त्यांच्या अटकेची तयारी सुरू केली. त्यावर तूर्त तरी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली, पण या मंडळींच्या डोक्यावर अटकेची व कारवाईची टांगती तलवार कायम आहे व ती तशीच ठेवली जाईल. खरे तर या सर्व पत्रकारांच्या मागे देशातील पत्रकारांनी ठामपणे उभे राहायला हवे असे त्यांनी लिहिले आहे.

लोक कालपर्यंत सन्माननीय पत्रकार, संपादक होते. मृणाल पांडे यांनी हिंदीतील प्रमुख दैनिके व मासिकांचे संपादकपद भूषविले आहे. त्यांनी वयाची सत्तरी पार केली. राजदीप सरदेसाई हे ज्येष्ठ पत्रकार व महान क्रिकेटपटू दिलीप सरदेसाईंचे चिरंजीव आहेत. ‘पद्म’ पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे. शशी थरूर हे एक विख्यात लेखक, पत्रकार व विद्यमान खासदार आहेत. संयुक्त राष्ट्रांतही थरूर यांनी आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. हे लोक एखाद्या प्रकरणात घाईगडबडीत चुकू शकतात, पण म्हणून त्यांच्यावर दंगलखोरीचे तसेच देशद्रोहाचे आरोप लावणे बरोबर नाही.

Team Global News Marathi: