“.तेव्हा आपले पंतप्रधान वाराणसीच्या गंगाकिनारी डमरू वाजवत होते” संजय राऊतांची घणाघाती टीका

 

रशिया-युक्रेन युद्धाचा आज बारावा दिवस आहे. दिवसेंदिवस युद्ध भयावह होत असताना हजारो भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने ऑपरेशन गंगा सुरू केलं. ऑपरेशन गंगावरून शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

युक्रेनमधून हाल-अपेष्टा सहन करून जे विद्यार्थी मायदेशी पोहोचले, त्यांनी ‘ऑपरेशन गंगा’ मोहिमेची पोलखोल केल्याने मोदी सरकारची झोप उडाली आहे. युद्धाचे ढग जमा होत आहेत व मोदींचे दोस्त पुतिनभाई ऐकण्याच्या मन:स्थितीत नाहीत याचे आकलन व्हायला आपल्या परराष्ट्र मंत्रालयास इतका का उशीर व्हावा, असा टोला शिवसेनेने लगावला आहे.

हिंदुस्थानचे विद्यार्थी युक्रेनमधील सुमी, किव, खार्किव येथे आक्रोश करत होते तेव्हा आपले पंतप्रधान वाराणसीच्या प्रचार सभेत गंगाकिनारी डमरू वाजवत होते. हेच जर कोणाला ‘ऑपरेशन गंगा’ वाटले असेल तर तुम्हाला कोपरापासून साष्टांग दंडवत, अशी खोचक टीका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून करण्यात आली आहे.

Team Global News Marathi: