विधानसभेत राष्ट्रवादी आमदाराचा महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर

 

मुंबई | बीडमधील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर विधानसभेत चर्चा करण्यात आली असून यावेळी विरोधकांबरोबर सत्ताधारी राष्ट्रवादी आमदारानेही बीडमधील वाढत्या गुन्हेगारीवर सरकारला घरचा आहेर दिला. बीड जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या गोळीबार प्रकरणावरून सभागृहात लक्षवेधी मांडण्यात आली. यावेळी प्रकाश सोळंके यांनी बीडचा बिहार झाल्याची स्थिती निर्माण झाली असून पोलिसांचा गुन्हेगारांवर कुठलाही वचक राहिला नाही. गुन्हेगारांना सर्रासपणे अभय देण्याचं काम बीड जिल्ह्यात सुरू आहे असं त्यांनी सभागृहात म्हटलं.

आमदार प्रकाश सोळंके म्हणाले की, बीड जिल्हाधिकारी कार्यालयात जो काही गोळीबार झाला त्यात ज्यांच्यावर गोळीबारी झाली त्यांच्यावर गंभीर गुन्हे पोलिसांनी दाखल केले. बीड जिल्ह्यात आज अवैध धंदे सुरू आहेत. दरोडे, चोऱ्या, मटका, वाळू माफियांचा उच्छाद सुरू आहे. त्यात निष्पाप नागरिकांचा बळी जातोय.

पुढे बोलताना ते म्हणाले की, आज बीडचा बिहार झाल्याचं वर्तमानपत्रात छापून येतंय. बीडमध्ये गुन्हेगारी वाढतेय त्याला पोलीस अधीक्षक जबाबदार आहे. पोलीस खात्यात ज्या बदल्या झाल्या त्यात मोठा भ्रष्टाचार झाला. दरमहिन्याला हे पोलीस अधीक्षक प्रत्येक पोलीस स्टेशनमधून हफ्ता गोळा करतात. वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत पोलीस अधीक्षकांच्या कारभाराची चौकशी करण्यात यावी. त्यांची तातडीनं बदली करावी अशी मागणी त्यांनी केली.

Team Global News Marathi: