…तर ‘मातोश्री’ला घेराव घालणार; नवी मुंबई विमानतळाच्या मुद्द्यावरून राजकारण तापणार!

 

मुंबई | नवी मुंबई विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन आता आणखी तापण्याची सह्यता वर्तवली जात आहे. त्यात आता आंदोलकांनी थेट मुख्यमंत्र्यांना इशारा दिला आहे. सदर आंदोलन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत:हून थांबविले पाहिजे. अन्यथा मुख्यमंत्र्यांना घराबाहेर पडू देणार नाही.

त्याचप्रमाणे ‘मातोश्री’ला घेराव घालण्यात येईल. त्याचबरोबर पंतप्रधानांकडे दिल्ली येथे अर्धनग्न अवस्थेत आंदोलन केले जाईल, असा इशारा पनवेलचे उपमहापौर जगदीश गायकवाड यांनी दिला आहे. स्वर्गीय दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण समर्थन समिती, कल्याण-डोंबिवलीतर्फे शनिवारी डोंबिवलीतील प्रगती कॉलेजच्या हॉलमध्ये विमानतळ नामकरण परिषद झाली.

गायकवाड म्हणाले की, आतापर्यंत झालेल्या १९ मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या नातेवाइकांची नावे विकासप्रकल्पांना दिलेली नाहीत. आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असते तर त्यांनीदेखील दि. बा. यांच्या नावाला विरोध केला नसता. दि. बा. यांच्या नावासाठी आगरी समाजाचे केंद्रात प्रथमच मंत्री झालेले कपिल पाटील आणि मनसेचे आमदार राजू पाटील हे आग्रही आहे. हे दोन्ही लोकप्रतिनिधी समाजाच्या पाठीशी उभे राहिले आहेत. समाज निवडणुकीत त्यांच्या पाठीशी उभा राहणार आहे.

Team Global News Marathi: