देशाच्या परिवर्तनाची सुरूवात महाराष्ट्रातून होत आहे-के चंद्रशेखर राव

पवारांच्या मार्गदर्शनात भाजपविरोधी तिसऱ्या आघाडीचा बारामतीतून लवकरच एल्गार

मुंबई :- तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrasekhar Rao) आज मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज आधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची त्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यानंतर राव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

 

मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर देशाच्या परिवर्तनाची सुरूवात महाराष्ट्रातून होत असल्याचे राव यांनी सांगितले तर पवारांच्या भेटीनंतरही त्यांनी मोठे विधान करून भाजपची चिंता वाढवली आहे. लवकरच सर्व राजकीय पक्षांची मोट बांधून बारामतीत समविचारी पक्षांची संयुक्त बैठक घेऊन पुढची भूमिका स्पष्ट करू. या बैठकीनंतर आघाडीचा अजेंडा देशासमोर ठेवण्यात येईल असेही राव म्हणाले. त्यामुळे शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मार्गदर्शनात भाजपविरोधात लढण्याचा एल्गार बारामतीतून होण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

के. राव म्हणाले, पवारांनी तेलंगना राज्य बनवण्यास मदत केली ती मदत मी आयुष्यभर विसरू शकत नाही. त्यामुळे सर्वात आधी मी त्यांचे मनापासून आभार मानतो. पवार आमचे वरिष्ठ नेते आहेत. हा देश नीट चालत नाही, पवारांचा सल्ला आम्ही येथे आलो. देशाचा विकास पूर्णपणे थांबला आहे. पवारांचा राजकारणाचा मोठा अनुभव आहे. पवारांच्या अनुभवांचा फायदा होईल. पवारांनी मला आशीर्वाद दिला आहे. एकत्र येण्यावर आमची सहमती झाली आहे. इतर पक्षांनाही एकत्र आणणार तेव्हा सर्व लोक बारामतीत भेटतील आणि चर्चा करतील. त्यानंतर आमच्या आघाडीचा नवा अजेंडा लवकरच देशाच्या समोर ठेवणार असल्याचेही राव यांनी स्पष्ट केले.

‘देशात खूप बदल करण्याची गरज आहे. या देशात बदल घडवण्यासाठी सर्व विरोधी पक्षांना एकत्र येण्याची गरज आहे. याच अनुषंगाने आम्ही देशातील सर्व विरोधी पक्षांशी चर्चा करत आहोत. देशातील जनता विरोधकांकडे खूप आशेने बघत आहे. आम्ही इतर पक्षांशी चर्चा करुन आणि एक चांगला अजेंडा घेऊन पुन्हा तुमच्यासमोर येऊ. शरद पवारांसोबत याच मुद्द्यांवर चर्चा झाली, हेच विचार मी त्यांच्यासमोर ठेवले, अशी माहिती केसीआर यांनी दिली.

 

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, ‘आजची बैठक वेगळ्या विषयावर होती. बैठकीत राजकीय चर्चा फार झाली नाही. देशातील बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या आणि शेतकऱ्यांचे इतर मुद्दे. यातून बाहेर कसे पडता येईल, यावर आज चर्चा झाली. आता आम्ही इतर विरोधी पक्षांशी चर्चा करणार आहोत, यानंतर सर्वांचे मत जाणून घेतल्यानंतर आम्ही एक संयुक्त बैठक घेऊन आमचा अजेंडा मांडू, अशी माहिती शरद पवारांनी दिली.

ग्लोबल न्युज नेटवर्क: