पवारांची पुढची पिढी राजकारणात सक्रिय, रेवती सुळे यांचा विरोधकांना टोला
शरद पवार हे राज्यातील नाही तर देशातील मोठे राजकारणी व्यक्तिमत्व, आज भल्या-भल्यांना उरून पुरणारे अशीच शरद पवारांची खरी ओळख आहे. याची प्रचिती विरोधकांना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीला आलेली आहे. अध्यक्ष शरद पवार यांच्या बरोबरीने उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार आज राजकारणात सक्रिय आहे. आज संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण पवार कुटुंबियांच्या बाजूने फिरताना अनेक वेळा दिसून आले आहे. त्यात आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची तिसरी पिढी राजकीय क्षेत्रात सक्रिय होताना दिसत आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे याही ट्विटरवर सक्रिय झाल्या आहेत. रेवती सुळे हे आज पर्यंत आपल्या कौटुंबिक फोटो ट्विटरवरून शेअर करत असतात. मात्र रेवती सुळे यांनी आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त ट्विट करत भारतीय जनता पक्षाला टोला लगावला आहे. आता या ट्विटची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु झालेली आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचं अभिनंदन करते असे ट्विट रेवती सुळे यांनी केले आहे.
पुढे सूचक टोला भाजपाला लगावला आहे. ‘जागतिक महामारी आणि विरोधकांकडून राजकारण होत असतानाही राज्याला तुम्ही विकासाच्या रस्त्याने नेत आहात’ असे ही ट्विट रेवती सुळे यांनी केले आहे.