नैसर्गिक संकटाची पाहणी करण्यासाठी अद्यापही केंद्राचे पाहणी पथक आले नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मी जे बोलतो ते जनतेच्या आणि महाराष्ट्राच्या हिताचे आहे आणि पुढेही बोलणार आहे

मुंबई : त्यांच्या ( भाजप ) कडून माझ्या कुटूंबावर द्वेषाने वैयक्तिक हल्ले केले जात आहेत.जेव्हा आम्ही त्यांच्यासोबत होतो तेव्हा चांगले होतो,कारण तेव्हा त्यांना प्रचारावेळी आमची गरज होती.आमच्या मदतीशिवाय त्यांची मतपेटी भरली नसती.आज ते ज्या प्रकारे माझ्या परिवारावर खालच्या दर्जाचे आरोप करीत आहेत परंतु मी त्यांच्याविरोधात खालच्या पातळीचे आरोप केले नाहीत.मी जे बोलतो ते जनतेच्या आणि महाराष्ट्राच्या हिताचे आहे आणि पुढेही बोलणार आहे.आम्ही भाजपसोबत असताना ते मला मोठा भाऊ म्हणायचे असे सांगतानाच त्यांना त्यावेळी मोठ्या भावाची कुंडली माहित नव्हती का ? त्यांना आता मोठ्या भावाची कुंडली समजली का ? आमच्याकडेही त्यांची कुंडली असून,जो जन्माला येतो तो कुंडली घेवूनच जन्माला येतो याची काळजी त्यांनी घ्यायला हवी असा,हल्ला शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे उद्या २८ नोव्हेंबर रोजी एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करीत आहेत.त्या पार्श्वभूमीवर त्यांनी संवाद साधला.आम्हाला रिमोटने सरकार चालविण्याचा अनुभव आहे.आणि आता तीन पक्षांचे सरकार चालविण्याचा अनुभव आला आहे. केंद्र सरकार असो की राज्य सरकार त्यांचे काम हे निष्पक्ष आणि भेदभाव न करणे हे त्याचे कर्तव्य आहे.ते म्हणाले की,कोरोनाच्या संकटात केंद्राने एका प्रकारे मदत केली आणि केलीही नाही.

चीनने १५ दिवसात कोविड रूग्णालयाची उभारणी केली.तर महाराष्ट्र सरकारनेही १७ दिवसात ७ हजार ५०० खाटांचे रूग्णालय उभारले.परंतु सप्टेंबर महिन्यापासून केंद्राने पीपीई किट.एन ९५ मास्क हळू हळू देणे बंद केले.या केंद्राच्या धोरणामुळे महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीवर सुमारे २५० ते ३०० कोटीचा बोजा पडला असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.आजही केंद्राकडून जीएसटीचे किमान ३६ हजार ते ३८ हजार कोटी रूपयांचा निधी राज्याला येणे बाकी असून,मध्यतरी महाराष्ट्रात आलेल्या नैसर्गिक संकटाची पाहणी करण्यासाठी अद्यापही केंद्राचे पाहणी पथक आले नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगतले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोरोनावरील लसीसंदर्भातही भाष्य केले.अद्यापही कोरोनावरील लसी उपलब्ध झालेली नाही,यासंदर्भात राज्य सरकारने अशा लसी तयार करणा-या कंपनींशी याबाबत चर्चा केली आहे.तर असा लसी तयार करणा-या कंपनीत जावून सध्या काय परिस्थिती आहे असे विचारण्याची घाई करणार नाही.कारण अशा लसी तयार करणा-या कंपन्या वेळोवेळी याबाबत सरकारला याची माहिती देत आहे असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.कोरोनावरील लस अद्याप आलेली नसली तरी ती लवकरच उपलब्ध होईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

मिळालेल्या माहितीनुसार कोरोनाची लस उपलब्ध झाल्यावर एका पेक्षा जास्त डोस देण्याची बाब समोर आली आहे.यानुसार राज्याचा विचार केला तर महाराष्ट्राला १२ कोटी लोकसंख्येसाठी सुमारे २४ कोटी लशीची आवश्यकता आहे.तर लसीकरणासाठी किती काळ लागेल याचा आढावा घेतला जात आहे. याशिवाय दररोज,आठवड्यातून आणि एका महिन्यात किती लस उपलब्ध होईल याचाही अंदाज घेतला जात असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.

मी शेतक-यांच्या बांधावर जावून जी आश्वासने दिली होती.त्यांची पूर्तता केली नसल्याचे आरोप केले जात आहेत या आरोपामध्ये कसलेही तथ्य नाही असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.मी शेतक-यांना जे आश्वासन दिले होते ते पूर्ण केले आहे.सरकारने शेतक-यांना कर्जमाफीचे दिलेले आश्वासन पूर्ण केले आहे.शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट,तिप्पट पाचपट करू आणि अच्छे दिन येतील असे वादे करीत नाही.तर शेतक-यांचा विश्वास संपादन करून पुढे जात आहे.यापुढील काळात मार्केट कसे शेतक-यांपर्यंत पोहचेल या महत्त्वाच्या योजनेवर सरकार काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मी तारीख पे तारीख देत नाही तर एकाच दिवसात निर्णय करतो,माझे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करणार नाही असे विरोधकांना वाटत असेल तर मी त्यांच्या आनंदाच्या आड येणार नाही, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.आम्ही आव्हानांना घाबरून पळणारे नसून, आम्ही काही स्वप्ने घेऊन सत्तेवर आलो आहोत आणि ती स्वप्ने पूर्ण करणारच असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.कोरोना संकटाला तोंड देत मी महाराष्ट्र हाताळत आहे.

 

मी सतत जनतेशी संवाद साधत आहे.काय करावे आणि काय करू नये हे मी लोकांना समजावून सांगत आहे.राज्यातील जनता मला आपल्या कुटूंबाचा एक भाग मानतात याचे समाधान वाटते असेही त्यांनी सांगितले.महाराष्ट्रात एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणण्याचे उद्दीष्ट मी आधीच ठेवले आहे. कोरोना साथीच्या आणि लॉकडाऊनमध्ये महाराष्ट्रात गुंतवणूक करतील की नाही ? याबद्दल एक संदिग्ध परिस्थिती होती.

परंतु महाराष्ट्राच्या चांगल्या प्रतिमेमुळे सरकारने जूनमध्ये १७ हजार कोटींच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.यानंतर गेल्या महिन्यात ३७ हजार कोटी रुपयांचा सामंजस्य करार झाले. महाराष्ट्रातील गुंतवणूकीच्या या सकारात्मक स्थितीमुळे महाराष्ट्रात सुमारे एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे आपला विधानपरिषदेचा मार्ग मोकळा झाला का ? मोदीच्या या सहकार्याशी आपण सहमत नसल्याने भाजपचे नेतृत्व नाराज असल्याची चर्चा आहे या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की,“सोडा. अशा निरुपयोगी गोष्टींमध्ये मला वेळ वाया घालवायचा नाही. एक वेळेचा जुना मित्र अशा प्रकारे वागतो याचा मानसिक त्रास होतो असेही त्यांनी यावेळी सांगितले.महामंडळावरील नियुक्त्याबाबत तिन्ही पक्ष एकत्र बसून याचा निर्णय घेणार आहेत.

रखडलेल्या राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या संदर्भातही यावेळी त्यांनी भाष्य केले.आम्ही यासंदर्भात १५ दिवसात निर्णय घ्यावा अशी विनंती केली होती. मात्र प्रार्थनास्थळे लवकरात लवकर खुली करण्यासाठी मागणी करणा-या राज्यपालांनी याबाबतही लवकर निर्णय घ्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका या महाविकास आघाडी करूनच लढणार आहोत असे सांगतानाच सध्या असलेल्या विधानपरिषदेच्या निवडणूका या आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढवत आहोत असे स्पष्ट केले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: