‘ ती ‘ ची कैफियत ; स्त्रीत्वाची न समजलेली बाजू भाग -१

‘ ती ‘ ची कैफियत
स्त्रीत्वाची न समजलेली बाजू भाग -१

संध्याकाळी सहा , साढ़े सहा ची वेळ असेल ठिकाण सदर कॉफी शॉप , थोडी फार गर्दी होतीच कॉफी शॉपला. चाकरमाण्यांची कार्यालयातून घराकडे परतीची वेळ होती म्हणूनही असेल .

मी सुद्धा कॉफीची ऑर्डर दिली .मैत्रिणीची वाट पहात होते. काही चर्चा करायची होती आम्हाला कवीसम्मेलना बाबतीत.पण घरातील गोंधळात सविस्तर बोलणं व्हायचं नाही म्हणून इथे कॉफी शॉप मधे भेटायचं ठरलं . ती अजून यायची होती. तेवढ्यात मागच्या टेबलावरील पुरुष मंडळींचा संवाद कानावर आला . दोघे मित्रच असावेत . पण संवाद ऐकून तळपायाची आग मस्तकात गेली . वाटलं उठावे आणी ताड़ ताड़ दोंघाच्या गालफडात मारावी .पण हे आपल्या तकलादु सभ्यतेत बसलं नसतं .

मी मात्र मनात खूप अस्वस्थ झाले . कॉफी तशीच ठेवून , बील देऊन बाहेर पडले . मैत्रिणीला फोन केला की मला ठीक वाटत नाही , मी निघतेय म्हणून आणी निघाले . त्या संवादाचा एकेक शब्द माझ्या डोक्यावर हातोडा मारल्यासारखा आदळत होता .आता वाटेल तुम्हाला असा कोणता संवाद होता ज्यामुळे मी इतकी कासावीस झाले तर त्या संवादाचा थोडक्यात सारांश असा ,

अरे यार ! काय बोरिंग लाइफ झाली आहे , काही थ्रीलच राहिले नाही . तेच घर , तीच बायको तेच संबध . शादी के पहले वाली लाइफ भी क्या लाइफ थी ! कितनी मस्ती की अब तो जैसे घर की मुर्गी ….! यार इन औरतों को समझता भी नही के आदमी थक हार के घर आता है तो उसे कैसे खुश करे , कुछ अलग , कुछ डीफरंट करे , कोई तो नयापन होना चाहिये ना . तू कर ना कुछ अरेन्जमेन्ट , चलते है गोवा या फिर फार्म हाउस , दो चार दिन के लिये . बोल देंगे घर पर ऑफीस के काम से बाहर जाना है . और देख ले कही कुछ सेटिंग हो तो . आयेंगे यार घुमके . रीफ्रेश हो जायेंगे . आखिर कुछ तो एंजायमेंट हो लाइफ मे .

आता तुम्ही म्हणाल की यात काय चिडण्यासारखे ? दोघे मित्र , करतातच अशी चर्चा .त्यांच लाइफ , मी का इतकी ओवर रीएक्ट करते हो ना ? मग एक करा ,
आता या दोन पुरुषांच्या ठिकाणी दोन स्त्रियांना ठेवून बघा . त्या आपल्या नवऱ्याला , त्याच्या त्याच रुटिनला कंटाळल्या असतील .

त्यांच्याशी तोच बेडरूमचा बंद खोलीत झालेल्या रटाळ संभोगाला कंटाळल्या असतील आणी थोडं चेंज म्हणून , रीफ्रेशमेंट म्हणून दुसऱ्या तरुण परपुरुषासोबत शारीरिक संबंधात रममाण होण्यासाठी बाहेर जायच्या प्लानिंग मधे असतील . तर आता तुमचा त्या स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टीकोण काय असेल .

किळसवाणे वाटतंय ना ? निर्लज्ज , कुलक्षणी ,कुलटा ,वेश्या असं बरंच काही मनात आलं ना ? किव ही आली असेल त्या माणसांची ज्यांच्या स्त्रिया इतका घाणेरडा विचार करतात .

पण काही वेळा पूर्वी त्या पुरुषांच्या पत्निंचा विचार नाही ना आला . का ? क्रमशः

© सपना फुलझेले
नागपुर …

ग्लोबल न्युज नेटवर्क: