ठाणे, पालघरमध्ये अमित ठाकरेंच्या महासंपर्क अभियानाला प्रचंड प्रतिसाद

 

मनसे नेते, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या मनविसे पुनर्बांधणी महासंपर्क अभियानाला सध्या जिल्ह्यात जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. मंगळवार सकाळी मीरा भाईंदर, दुपारी वसई विरार आणि रात्री पालघर बोईसर येथे अमित ठाकरे यांनी दौरा केला. प्रत्येक ठिकाणी त्यांना भेटायला दोनशेहून अधिक महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी आले होते. अमित ठाकरे यांच्या या दौऱ्यामुळे ठाणे पालघर जिल्ह्यात मनसे कार्यकर्त्यांना बळ मिळणार असल्याचा विश्वास स्थानिक नेते व्यक्त करत आहे.

सकाळी १० वाजता अमित यांनी मीरा भाईंदर येथील बैठक घेतली, तर रात्री ११ वाजता त्यांची पालघर बोईसर येथील बैठक संपली. मीरा भाईंदरमध्ये जोरदार प्रतिसाद लाभला. मंगळवारी सकाळी १० ते दुपारी १.३० दरम्यान नवघर येथे महाविद्यालयीन विद्यार्थी, मनविसे तसंच पक्ष पदाधिकाऱ्यांशी अमित ठाकरे यांनी संवाद साधला. वसई विरार महापालिकेतील पदाधिकारी तसंच विद्यार्थ्यांना अमित ठाकरे नालासोपारा येथे भेटले. शेकडो विद्यार्थ्यांनी यावेळी मनसेत प्रवेश केला. या विद्यार्थ्यांशी तसंच स्थानिक पदाधिकाऱ्यांशी अमित यांनी संवाद साधला.

ठिकठिकाणी झालेले स्वागत, पदाधिकाऱ्यांशी झालेला प्रदीर्घ संवाद आणि नवीन विद्यार्थी तरुणांच्या मुलाखती यांमुळे अमित यांना पालघर बोईसर येथे पोहोचायला रात्रीचे १०.१५ वाजले. त्यापुढे रात्री ११ उलटले, तरी अमित ठाकरे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांशी सविस्तर संवाद साधला. अमित ठाकरे यांच्या १२ तासांहून अधिक चालणाऱ्या बैठक सत्रामुळे मनसे पदाधिकाऱ्यांचा उत्साह द्विगुणित झाला आहे. याप्रसंगी पक्षाचे नेते अभिजित पानसे, सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे, जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव उपस्थित होते.

Team Global News Marathi: