अतिवृष्टीबाधितांना तातडीने मोफत धान्य, केरोसिन देण्याचा ठाकरे सरकारचा निर्णय !

 

नाशिक महाराष्ट्रासह कोंकण आणि पश्चिम महाराष्ट्राला पावसाने झोडपून काढला आहे. आज अनेक नद्यांना पूर येऊन अनेकांचा संसार या पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. तसेच अनेक ठिकाणी दरडी कोसळून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच पार्श्वभूमीवर आता ठाकरे सरकारने पूरग्रस्त भागासाठी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

अतिवृष्टीमुळे आलेला महापुराच्या संकटात सापडलेल्या नागरिकांसाठी तातडीने १० किलो गहू, १० किलो तांदूळ, ५ किलो डाळ आणि दुप्पट शिवभोजन देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळांनी घेतला. नाशिक येथे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील अनेक भागांत अतिवृष्टीचे संकट कोसळले आहे. काही ठिकाणी दरडी कोसळून अनेक व्यक्ती मृत्यमुखी पडले, तर कित्येक बेपत्ता झाले आहेत. त्या-त्या जिल्ह्यातील मंत्र्यांशी आपण बोललो असल्याचेही भुजबळांनी सांगितले.

पावसाचा जोर कमी होत असल्याने मदतीला वेग येतो आहे. दरम्यान, अनेक गावांमध्ये घरे पाण्याखाली गेल्याने साठवलेले अन्नधान्य खराब झाले आहे. अनेक कुटुुंब निराधार झाले आहेत. अशा नागरिकांना ज्यांना गहू नको असेल त्यांना तांदूळ दिला जाईल. परिस्थिती सुरळीत होत नाही तोपर्यंत ही मदत दिली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Team Global News Marathi: