दहावी- बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना कोविडची लस द्यावी, शिवसेनेच्या या खासदाराने केली लोकसभेत मागणी

एप्रिल महिन्यात ऑफलाईन परीक्षेला बसणाऱ्या दहावी आणि बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांचे कोविड लसीकरण करावे, अशी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत केली. लोकसभेच्या शून्य प्रहरात विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचा मुद्दा उपस्थित करून याबाबत केंद्र सरकारने सर्व राज्यांना तातडीने आदेश द्यावेत, अशीही विनंती शेवाळे यांनी केली.

खासदार शेवाळे म्हणाले,राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन म्हणजेच प्रत्यक्ष परीक्षा केंद्रावर घेण्याचा निर्णय नुकताच महाराष्ट्रात घेण्यात आला. यंदा राज्यातून 10 वी साठी 13 लाख तर 12 वी साठी 16 लाख विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत.याशिवाय आयसीएसइ आणि आयएससी परिक्षेसाठीही अनुक्रमे 12 हजार आणि 23 हजार विदयार्थी बसणार आहेत.

तसेच सिबीएससी च्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. ज्या विद्यार्थ्यांना काही कारणास्तव परीक्षेला उपस्थित राहता येणार नाही, त्यांना 15 दिवसांची मुदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, या परीक्षेला येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता पालकांची चिंता वाढली आहे.

अशा परिस्थितीत, परीक्षेला बसणाऱ्या सर्व विदयार्थ्यांना कोविड लस देण्यात आली तर हे विद्यार्थी आणि त्यांचे पालक निर्धास्त होऊन परीक्षेला सामोरे जातील. तसेच परीक्षेच्या वेळी उपस्थित राहणारे शिक्षक, कर्मचारी या सगळ्यांचे लसीकरण करण्याची गरज असून ही प्रक्रिया तातडीने सुरू करून परीक्षा सुरू होण्याच्या आत पूर्ण करायला हवी, अशी मागणी खासदार शेवाळे यांनी केली.

Team Global News Marathi: