दहावी आणि बारावीची परीक्षा ऑफलाइनच होणार, शिक्षण विभागाची माहिती

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. त्यात कोरोना रुग्णांच्या वाढत्या आलेखामुळे राज्य सरकारची डोकेदुखी आणखी वाढली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा प्रश्न देखील उपस्थित झाला होता. परीक्षा ऑनलाइन की ऑफलाइन होणार असा प्रश्न उपस्थित झाला होता.

मात्र दोन्ही बोर्डाच्या परीक्षा हया ऑफ़लाइनच होणार आहे. अशी माहिती शिक्षण विभागाने दिलेली आहे. दहावी, बारावीची परीक्षा ऑनलाईन घेण्यास बोर्ड अनुकूल नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने दहावी, बारावीच्या परीक्षांच्या तयारीचा आढावा घेतला त्यावेळी या संदर्भात चर्चा होऊन निर्णय घेण्यात आलेला आहे.

तसेच दहावी, बारावीची परीक्षा सध्या तरी ठरलेल्या वेळापत्रकानुसार घेण्याबाबत सोमवारी झालेल्या बैठकीत चर्चा झाली. कोरोना संकटात ऑनलाईन शिक्षणाला प्राधान्य देण्यात आले आहे. मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेता येत नव्हते. त्यामुळे ऑनलाईन परीक्षा घेतल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

Team Global News Marathi: