टाटांचे दातृत्व जगात नंबर वन ! 102 अब्ज डॉलर्सची संपत्ती दान, ‘टॉप’50 दानशूरांत अझीम प्रेमजी

टाटांचे दातृत्व जगात नंबर वन ! 102 अब्ज डॉलर्सची संपत्ती दान, ‘टॉप’50 दानशूरांत अझीम प्रेमजी

 

टाटा हा केवळ उद्योगातील ब्रँड नाही, तर टाटा म्हणजे दातृत्व, परोपकार हे ब्रीद असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. गेल्या शतकभरात जगातील ‘टॉप 50’ दानशूरांमध्ये सर्वात मोठे दानशूर जमशेदजी टाटा आहेत. टाटांनी तब्बल 102 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतके दान केले आहेत. या यादीत टाटांव्यतिरिक्त ‘विप्रो’चे अझीम प्रेमजी यांचा समावेश असून, त्यांनी 22 अब्ज डॉलर्सची संपत्ती दान केली आहे.

हुरून रिपोर्ट आणि एडेलगिव फाऊंडेशनने गेल्या शंभर वर्षांतील टॉप दानशूर कोण आहेत याचा शोध सुरू केला. जगभरातील उद्योगपतींच्या देणग्यांचे संशोधन करून 50 टॉप दानशूरांची यादी जाहीर केली. यामध्ये हिंदुस्थानच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. टाटा उद्योग समूहाची 1892 मध्ये मुहूर्तमेढ रोवणारे जमशेदजी टाटा हे देशातील उद्योग क्षेत्राचे पितामह म्हणून ओळखले जातात. स्टील उद्योगापासून सॉल्ट ते सॉफ्टवेअरपर्यंत अनेक उद्योग टाटा समूहाने उभारले. गुणवत्ता आणि दातृत्व याचा अनोखा संगम म्हणजे टाटा. टाटा उद्योगाच्या शिक्षणापासून आरोग्यपर्यंत अनेक ट्रस्ट आहेत. कोरोना काळातही टाटांनी मदत केली आहे.

टॉप 50मध्ये दोन हिंदुस्थानी

– जमशेदजी टाटा यांनी 102 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी संपत्ती दान केली. दुसऱया क्रमांकावर मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा गेट्स यांनी 74.6 अब्ज डॉलर्स दान केले. तिसऱया क्रमांकावर अमेरिकन उद्योगपती, गुंतवणूकदार वॉरन बफे यांनी 37.4 अब्ज डॉलर्स, चौथ्या क्रमांकावर हंगेरीचे जॉर्ज सोरोस यांनी 34.8 अब्ज डॉलर्स, पाचव्या क्रमांकावर असलेली जॉन डी. रॉकफेलर यांनी 26.8 अब्ज डॉलर्सची संपत्ती दान केली आहे.

– 50 जणांच्या दानशूरांमध्ये सर्वाधिक 38 जण अमेरिकेतील आहेत. ब्रिटनमधील 5 आणि चीनमधील 3 तर हिंदुस्थानातील दोन जमशेदजी टाटा आणि ‘विप्रो’चे अझीम प्रेमजी आहेत. प्रेमजी यांनी 22 अब्ज डॉलर्स संपत्ती दान केली आहे.
– 50 दानशूरांमधील 37 जणांचा मृत्यू झालेला आहे, तर 13 जण हयात आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: