टाटा एअरबस प्रकल्प गेल्याने ब्राह्मण महासंघाचा शिंदे फडणवीस सरकारवर संताप

 

वेदांता फोक्सकॉन प्रकल्पापाठोपाठ आता नागपुरात येणारा एअरबस प्रकल्पदेखील महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला आहे. हा प्रकल्प नागपुरातील मिहानमध्ये साकारण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला होता. त्यासाठी, पाठपुरावा सुरू असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनीच यापूर्वी म्हटलं होतं. मात्र, आता हाही प्रकल्प गुजरातला गेल्याने शिंदे सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० ऑक्टोबर रोजी त्याचे भूमिपूजन करणार आहेत. त्यावरुन, विरोधकांनी सरकारला लक्ष्य केलं आहे. तर, ब्राह्मण महासंघानेही शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली.

ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी थेट महाराष्ट्र सरकावर जोरदार प्रहार केला. एक नंबरवरील महाराष्ट्र 5 व्या नंबरवर चालला आहे. मात्र, सगळे राजकारण करण्यातच दंग आहेत. त्यामुळे बाकरवडी आणि ढोकळा एकत्र करा, महाराष्ट्रच गुजरातमध्ये विलीन करा, अशी खोचक टीका आनंद दवे यांनी केली आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सप्टेंबरमध्येच हा प्रकल्प नागपुरात होणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, आता २२ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा हा प्रकल्प गुजरात राज्यातील बडोदा येथे उभारला जाईल.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. आमचा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवणार? अशी विचारणा त्यांनी सत्ताधाऱ्यांना केली आहे. ट्विटच्या माध्यमातून भाष्य करताना ते म्हणाले की, वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पानंतर नागपूरमध्ये होणारा २२ हजार कोटींचा टाटा एअरबस प्रकल्प आज गुजरातला गेला. एकामागून एक मोठे प्रकल्प गुजरातला जात आहेत. महाराष्ट्रातील सध्याचे सरकार दिल्लीसमोर किती हतबल झाले आहे, हे यातून स्पष्ट होते.

Team Global News Marathi: