नगरपालिका-महापालिका निवडणूक जानेवारीत होणार असल्याचं वृत्त तथ्यहीन

 

राज्यातील नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या आगामी निवडणुका जानेवारी महिन्यात होणार असल्याचं वृत्त तथ्यहीन असल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री कार्यालयाने दिलं आहे. “नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या आगामी निवडणुका जानेवारी महिन्यात घेण्यात येणार आहेत, असं वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिलं असून त्यात कोणतंही तथ्य नाही. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असून अंतिम निकालानंतर राज्य निवडणूक आयोग या निवडणुकांसदर्भात निर्णय घेईल.”

मुदत संपलेल्या नगरपालिका आणि महानगरपालिकांमध्ये प्रशासक नियुक्त केले असून त्यांच्या माध्यमातून कारभार सुरु आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हा विषय राज्य निवडणूक आयोगाचा आहे. त्यामुळे राज्य शासन जानेवारी महिन्यात या निवडणुका घेणार आहे, असं काही प्रसारमाध्यमांनी दिलेलं वृत्त तथ्यहीन आहे, असंही मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केलं आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. परंतु निवडणूक कधी होणार असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. या निवडणुकीबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात असतानाच जानेवारी महिन्यात मुंबई महापालिकेची निवडणूक जानेवारी महिन्यात होईल, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्याचं समोर आलं होतं. तर मुंबई महापालिकेची निवडणूक कधी होणार हे फक्त देव आणि न्यायालय यांनांच माहित असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं.

Team Global News Marathi: