तर साडेतीन वर्षाच्या नातीसह संपूर्ण कुटुंब आत्महत्या करू; माजी नगरसेवकाचा मुख्यमंत्र्यांना इशारा

उद्धव ठाकरेंशी फारकत घेत एकनाथ शिंदे यांनी भाजपाशी हातमिळवणी केली. बाळासाहेबांचे हिंदुत्ववादी विचार आम्ही पुढे घेऊन जात असल्याचं सांगत शिंदेंनी शिवसेनेवर दावा केला अशातच शिंदे यांच्या भूमिकेला शिवसेनेचे ४० आमदार आणि १२ खासदार यांनी पाठिंबा दिला. त्याचसोबत पक्षातील विविध पदाधिकारी, कार्यकर्तेही शिंदे गटात सहभागी झाले. मात्र नवी मुंबईच्या एका माजी नगरसेवकाने शिंदे गटावर गंभीर आरोप केले आहेत.

माजी नगरसेवक एम. के मढवी म्हणाले की, मागील २ महिन्यापासून शिंदे गटाकडून माझ्यावर त्यांच्यासोबत येण्यासाठी दबाव टाकला आहे. माझ्यावर तडीपारीची कारवाई करण्याची नोटीस देत कुटुंबापासून दूर करण्याचा डाव आखला आहे. नवी मुंबईचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी मला शिंदे गटात सहभागी व्हा अन्यथा तुमचा एन्काऊंटर करू अशी धमकी देत १० लाख रुपये देण्याची मागणी केली. या प्रसंगामुळे माझ्यावर मानसिक दडपण आले आहे असं त्यांनी म्हटलं आहे.

तसेच मला, माझ्या कुटुंबाला धोका आहे. शिंदे गटात सहभागी झाले नाही तर एन्काऊंटर करण्याची धमकी दिली. माझ्यावर खोटे आरोप आणि खोट्या केसेस करून तडीपार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जर माझ्यावर अशी कारवाई होत असेल तर मी, माझं कुटुंब, साडेतीन वर्षाची नात, २ मुले, सुन, पत्नीसह आत्महत्या करू. आमच्या जीवाला कमी जास्त झालं तर त्याला जबाबदार विवेक पानसरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, संदीप नाईक, विजय चौगुले जबाबदार असतील असा इशारा एम. के मढवी यांनी दिला आहे.

Team Global News Marathi: